Join us

मशाली घेऊन कोळी महिलांचे आंदोलन; अनधिकृत बांधकामावर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 01:04 IST

जमीन नावे करण्याची मागणी

मनोहर कुंभेजकर मुंबई : अंधेरी (पूर्व), मरोळ जे.बी.नगर मेट्रो स्टेशनजवळ पुरातन सुक्या मासळीच्या बाजारामध्ये होत असलेले अनधिकृत बांधकाम, येथील मासळी बाजारात सुक्या मासळीची विक्री करत असलेल्या सुमारे २०० कोळी महिलांनी हातात हातोडा व मशाली घेऊन तोडून टाकले.

मरोळ बाजार मासे विक्रेता कोळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री भानजी यांच्यासह २०० कोळी महिलांनी हे आंदोलन केले. यावेळी २० ते २५ कोळी बांधव उपस्थित होते. यावेळी कोळी महिलांनी मशाली पेटवून बाजार संरक्षित करण्यासाठी एकजुटीने लढण्याची शपथ घेतली. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा त्यांनी दिल्या. अतिक्रमण थांबविण्यासाठी गुरुवारी रात्री ७ ते ८ यावेळेत कोळी महिलांनी मशाली हाती घेऊन आंदोलन केले. आंदोलकांनी बाजारात सुरू केलेले अतिक्रमण तोडून टाकले. बाजार संरक्षित करण्यासाठी मशाल तेवत ठेवण्याची प्रतिज्ञा करत बाजाराचा सातबारा कोळी भगिनींच्या नावे करावा, अशी घोषणाबाजी केली. यावेळी वेसावा, अर्नाळा, उत्तन मालवणी मनोरी, भाटी, मढ, भाटी, रायगड येथून २०० कोळी महिला आंदोलनात सहभागी झाल्या.पुरातन असलेल्या मरोळ येथील सुक्या मासळी बाजाराची जमीन मासे विकत असलेल्या कोळी भगिनींच्या नावे करावी, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे नेते राजाराम पाटील यांनी केली. मासळी बाजाराच्या जागेवर महानगरपालिका निरनिराळ्या कारणास्तव अतिक्रमण करू पाहत आहे. त्यास विरोध करण्यासाठी आयोजित सभेत पाटील बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेचे कार्य हे प्राथमिक सुविधा आणि दिवाबत्ती करण्याचे आहे. मालकी दाखविण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही. पिढ्यान्पिढ्या ही जागा कोळी भगिनींनी सुरक्षित ठेवली आहे. सुकी मासळी विकण्यास परंपरेने वापर करीत असल्याने ही जमीन जिल्हाधिकारी कार्यालयाने कोळी महिलांच्या नावे करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बाजाराच्या जमिनीवर शिफ्टिंगच्या नावाखाली हॉटेल आणि बार रेस्टॉरंट, खानावळ महानगरपालिकेच्या मेहेरबानीने वसले आहे. बाजारावरील अतिक्रमणे हटविण्यात यावी, अशी मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी केली. यावेळी कोळी महिला समाजसेविका रेखा पागधरे, मालवणी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष हेमंत कोळी, हरेश्वर कोळी, किरण गायकवाड, अमृता कोळी यांची भाषणे झाली.