कोल्हापूर - काँग्रेसचा ‘उत्तरा’धिकारी कोण?
By Admin | Updated: August 5, 2014 23:28 IST2014-08-05T23:01:08+5:302014-08-05T23:28:13+5:30
शनिवारी कार्यकर्ता मेळावा : सतेज पाटील यांचा पुढाकार

कोल्हापूर - काँग्रेसचा ‘उत्तरा’धिकारी कोण?
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण हे ठरविण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने शनिवारी (दि. ९) या मतदारसंघातील काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा येथील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये सकाळी दहा वाजता मेळावा होत आहे. माजी आमदार मालोजीराजे हे लढण्यास तयार नसतील, तर काँग्रेसचा या मतदारसंघातील उमेदवार कोण असावा, याबाबतची चाचपणी या मेळाव्यात केली जाणार आहे.
हा मेळावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने होत आहे. ते स्वत: कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवार असले, तरी राज्य मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्री म्हणून जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारीबाबत पक्षाला माहिती देणे, या मतदारसंघांतील पक्षाचे संघटन मजबूत करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्याशिवाय कोल्हापूर उत्तरमधील बराचसा भाग हा त्यांच्या जुन्या करवीर मतदारसंघातील आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांनाही या मतदारसंघात आम्ही गप्पच बसायचे काय, अशी विचारणा वारंवार होऊ लागली आहे. त्या भावनेतून त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे. विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्या तरीही काँग्रेस शांत आहे. गत निवडणुकीत पराभूत झाल्यापासून माजी आमदार मालोजीराजे यांनी राजकारणातून अंग काढून घेतल्यासारखीच स्थिती आहे. पुण्यातील शिक्षण संस्थेच्या व्यवहारात त्यांनी लक्ष घातल्याने ते निवडणुकीस उभे राहण्याची शक्यता नाही. गेल्याच महिन्यात झालेला वाढदिवसही त्यांनी साजरा केला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व टोल आंदोलनातील त्यांची उपस्थितीही अगदीच नगण्य आहे. कार्यकर्त्यांशी दैनंदिन संपर्क नाही. पक्षाच्या मेळाव्यांनाही त्यांची उपस्थिती नसते. त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क होणे हे देखील मुश्कील होऊन बसले आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान केल्यासारखी स्थिती आहे. अशा स्थितीत त्यांचा उत्तराधिकारी कोण, अशी विवंचना कार्यकर्त्यांनाही लागून राहिली आहे. त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरविले जावे, अशाही हालचाली सुरू
होत्या, परंतु त्याही फारशा पुढे सरकलेल्या नाहीत. त्या रिंगणात उतरल्या तर ही लढत जोरात होऊ शकते. कारण त्यांचा व्यक्तिगत संपर्क चांगला आहे. त्यांच्याकडे वडिलांप्रमाणे माणसे जोडण्याची कला आहे. त्या सुशिक्षित असून, महिलांतून त्यांना चांगले पाठबळ मिळू शकते, परंतु त्यांच्या उमेदवारीबाबतही घराण्यातून फारशा सकारात्मक हालचाली नाहीत. अशा स्थितीत या मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवारीचे काय करायचे, अशी विचारणा कार्यकर्त्यांतूनही होऊ लागली
आहे.
सत्यजित कदम हाच पर्याय
सद्य:स्थितीत या मतदारसंघातून नगरसेवक सत्यजित कदम, रवी इंगवले यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही इंगवले यांनी मुख्यमंत्र्यांपासून पक्षाच्या इतर नेत्यांवर जाहीर टीका केल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेसपुढे आता सत्यजित कदम हाच सक्षम पर्याय आहे. कदम यांचे वडील शिवाजीराव कदम हे शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. जुन्या कोल्हापुरात त्यांना मानणारा वर्ग आहे. स्वत: सत्यजित यांची प्रतिमा विकासकामांसाठी धडपडणारा नगरसेवक अशी आहे.
प्रदेशाध्यक्षांना भेटणार
उद्या अथवा गुरुवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मालोजीराजे यांची भेट होण्याची शक्यता आहे. तिथे चर्चा झाल्यानंतर कोल्हापुरात कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय व्हावा, यासाठी मेळावा घेतला आहे.