कोल्हापूर :--मद्यपी उद्यान अधीक्षकास अटक
By Admin | Updated: September 18, 2014 00:10 IST2014-09-18T00:09:03+5:302014-09-18T00:10:13+5:30
संचालकांना शिवीगाळ : टाऊन हॉल उद्यान कार्यालय तपासणीला विरोध केल्याने कारवाई

कोल्हापूर :--मद्यपी उद्यान अधीक्षकास अटक
कोल्हापूर : येथील टाऊन हॉल शासकीय उद्यानाची तपासणी करण्यास आलेल्या शासनाच्या उपवने व उद्यान विभाग मुंबईच्या संचालकांना शिवीगाळ करून कार्यालयाची तपासणी करण्यास विरोध केल्याप्रकरणी उद्यान अधीक्षकास लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज, बुधवारी अटक केली. संशयित आरोपी हरीश तुकाराम नेहेपाटील (वय ५६, रा. टाऊन हॉल गार्डन) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, शासकीय टाऊन हॉल गार्डनची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी उद्यान अधीक्षक म्हणून हरीश नेहेपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उद्यानाच्या कार्यालयाची तपासणी करण्यासाठी उपवने व उद्यान विभाग मुंबईचे संचालक बालचंद्र कोपुलवार यांच्यासह डी. एस. कचरे, व्ही. जी. रावळ, डी. एम. गुरव, डी. डी. ठाकर व एन. जी. वासुदेव आदींची समिती काल, मंगळवारी आली होती. त्यावेळी उद्यान अधीक्षक मद्यसेवन करून होते. याबाबत त्यांना संचालक कोपुलवार यांनी विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली तसेच कार्यालयाची तपासणी करण्यास विरोध केला. दारूच्या नशेत असल्यामुळे फारसे लक्ष न देता सर्वजण माघारी परतले. आज पुन्हा अकराच्या सुमारास तपासणी करण्यास आले असता पाटील याने मद्यसेवन केल्याचे लक्षात आले. तपासणीसाठी काही माहिती विचारली असता पुन्हा त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सलग दोन दिवस प्रकार घडल्याने संचालक कोपुलवार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून नेहेपाटील याला अटक केली. (प्रतिनिधी)
साहेब, एकदा माफ करा
उद्यान अधीक्षक नेहेपाटील याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केल्याचे समजताच त्यांची पत्नी संगीता नेहेपाटील पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी संचालक कोपुलवार यांना ‘साहेब, एकदा माफ करा, मी आपली माफी मागते, गुन्हा मागे घ्या,’ अशी विनंती केली. त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे यांनी आता त्याचा काही उपयोग नाही, गुन्हा रजिस्टर केला आहे, असे सांगितले
निलंबनाची कारवाई होणार?
टाऊन हॉल उद्यानाच्या कार्यालयात कामावर (आॅन ड्युटी) असताना हरिश नेहेपाटील यांनी मद्यसेवन करून आम्हाला शिवीगाळ करून तपासणी करण्यास विरोध केला. त्यांच्यावर कायदेशीर पोलिसांकरवी कारवाई केली आहे. सीपीआर येथे वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांनी मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना तत्काळ निलंबित केले जाईल.
बालचंद्र कोपुलवार (संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य)
पोलिसांनाच दमदाटी
उद्यान अधीक्षक हरिश नेहेपाटील यांना तिघा पोलिसांनी टाऊन हॉल बागेतून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. नेहे-पाटील हे दंगा करीतच पोलीस ठाण्यात गेले. सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे यांच्या कक्षामध्ये खुर्चीवर पायावर पाय टाकून रूबाब मारण्याचा प्रयत्न केला. लोकरे हे त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांनाच उलट प्रश्न ते विचारू लागले. हातवारे नाचवून मोठ-मोठ्याने त्यांनी पोलिसांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
तपासणीविनाच परतले
राज्यातील सर्व शासकीय उद्यानांची
तपासणी करण्याची जबाबदारी संचालक कोपुलवार व त्यांच्या पथकावर आहे. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय उद्यानांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ते मंगळवारी टाऊन हॉल उद्यानाची तपासणी करण्यास आले होते, परंतु उद्यान अधीक्षक हरीश नेहेपाटील यांनी त्यांना विरोध करत तपासणी करण्यास रोखले. अखेर गुन्हा दाखल करून ते तपासणी न करताच माघारी मुंबईला निघून गेले.