Join us  

जाणून घ्या... राज ठाकरेंसोबत प्रामाणिक असणा-या 'त्या' एका नगरसेवकाविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 11:57 AM

शिवसेनेने काल मनसेच्या मुंबईतील सात पैकी सहा नगरसेवकांना फोडून एकाचवेळी राज ठाकरे आणि भाजपाला जोरदार झटका दिला.

ठळक मुद्देसंजय तुर्डे तेच नगरसेवक आहेत ज्यांच्यावर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच भाजपाच्या पराभूत उमेदवाराने हल्ला केला होता. महापालिकेतील मनसेचे माजी गटनेते दिलीप लांडे यांनी आपल्याला शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली होती

मुंबई - शिवसेनेने काल मनसेच्या मुंबईतील सात पैकी सहा नगरसेवकांना फोडून एकाचवेळी राज ठाकरे आणि भाजपाला जोरदार झटका दिला. मनसेचे सहा नगरसेवक शिवबंधनात अडकले असले तरी, एकनगरसेवक मात्र अजूनही राज ठाकरेंशी प्रामाणिक आहे. कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक संजय तुर्डे अजूनही राज ठाकरेंसोबत आहेत. महापालिकेतील मनसेचे माजी गटनेते दिलीप लांडे यांनी आपल्याला शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली होती पण आपण राज ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे त्यांना स्पष्ट केले  असे संजय तुर्डे यांनी सांगितले. 

संजय तुर्डे तेच नगरसेवक आहेत ज्यांच्यावर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच भाजपाच्या पराभूत उमेदवाराने हल्ला केला होता. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर संजय तुर्डे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर उभे असताना भाजपाचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह हल्ला केला होता. तलवारी, पेव्हर ब्लॉक, लोखंडी रॉडने, लाठया-काठयांनी संजय तुर्डेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. 

वॉर्ड क्रमांक 166 मधून संजय तुर्डे यांनी 1,100 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. भाडूंपच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार जागृती पाटील यांच्या विजयानंतर शिवसेनेने लगेचच मनसेच्या सहा नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. यामुळे शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ वाढले असून, सत्तेला असणारा धोका कमी झाला आहे. 

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांच्या घरांना पोलीस संरक्षण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहाही नगसेवकांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं आहे. नाराज झालेल्या मनसे कार्यकर्त्यांकडून काही अघटीत होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नगरसेकांच्या घरांना आणि कुटुंबियांना पोलीस संरक्षण दिलं आहे. दरम्यान सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची माहितीही मिळत आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. 

‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणा-या भाजपाला शिवसेनेने शुक्रवारी जोरदार धक्का दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार षटकारच लगावला. त्यामुळे महापालिकेतील शिवसेनेचे संख्याबळही अधिक मजबूत झाले. शिवसेनेच्या या आकस्मिक खेळीने एकाच वेळी भाजपा आणि मनसेला चीतपट केले.मनसेच्या सहा नगरसेवकांना फोडून शिवसेनेने भाजपाच्या स्वप्नाला दुस-यांदा सुरुंग लावला. प्रभाग क्रमांक १६६ चे संजय तुर्डे वगळता मनसेच्या सर्व सहा नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तसे पत्र शिवसेनेच्या नेत्यांनी आज सकाळी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केले. त्यानंतर हे नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्याचे पत्र पालिका आयुक्त अजय मेहता यांना संध्याकाळी सादर करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ (८५ अधिक ६) ९१ वर पोहोचले आहे. याशिवाय शिवसेनेला तीन अपक्षांचे समर्थन आहे.

टॅग्स :मनसेराज ठाकरे