Join us

लोकल प्रवासात उद्या विघ्न; पश्चिम, मध्य हार्बरवर कुठे, कधी अन् कसा असेल मेगाब्लॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 06:21 IST

Mumbai Mega Block on March 9, 2025: मुंबई उपनगरीय पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर शनिवार, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घ्या, सविस्तर...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री, तर मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड अप तसेच डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर आरओबीच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक शनिवारी आणि रविवारी घेण्यात येणार आहे. 

पश्चिम रेल्वेवर असा ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११:३० ते रविवारी पहाटे ३:३० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावरील सर्व गाड्या धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. 

कसारा मार्गावर विशेष ब्लॉक 

मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर शनिवारी आणि रविवारी  पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील गर्डरच्या लाँचिंगसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यातील पहिला ब्लाॅक शनिवारी सकाळी ११:४० ते दुपारी १२:१० या वेळेत असणार आहे; तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक रविवारी सकाळी ११:४० ते दुपारी १२:१० आणि दुपारी ४ ते संध्याकाळी ४:२५ पर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत कसारापर्यंतच्या लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.

मध्य आणि हार्बर रेल्वे 

मध्य  रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड अप तसेच डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११:१५ ते दुपारी ३:४५ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११:१० ते संध्याकाळी ४:४० या कालावधीत सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

या कालावधीत सीएसएमटीवरून वाशी/बेलापूर/पनवेल आणि  वांद्रे/गोरेगावसाठी सेवा उपलब्ध नसेल. मात्र या कालावधीत पनवेल -कुर्ला- पनवेलदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर लाइनच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील स्टेशनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

 

टॅग्स :मुंबई लोकल मेगा ब्लॉकमुंबई लोकलपश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वे