पक्षांतरासाठीची पतंगबाजी सुरू होणार
By Admin | Updated: January 16, 2015 03:25 IST2015-01-16T03:25:53+5:302015-01-16T03:25:53+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पक्षांतरासाठीची पतंगबाजी सुरू होणार
नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख राजकीय पक्षांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेत्यांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे शहरात लवकरच मोठ्या प्रमाणात राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मकर संक्रांतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सवांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने शहरातील राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या पतंगबाजीची व संभाव्य पक्षांतराची चर्चाही जोरात सुरू आहे. कोणत्या पक्षात कोण जाणार, कोणत्या पक्षाला फटका बसणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईतील सर्वच राजकीय पक्षांची समीकरणे बदलली आहेत. शहराच्या राजकारणावर एकहाती पकड असलेल्या गणेश नाईक यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बिथरले आहेत. अनेकांनी भाजपामध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवाय नाईकांनीही भाजपामध्ये जावे, अशी मागणी जाहीर मेळावा घेऊन करण्यात आली आहे. संभाव्य राजकीय भूकंपाची जवळपास एक महिना चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीमधील काही नगरसेवक शिवसेनेमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. काँगे्रसमधील माजी नगरसेविका संगीता सुतार यांनी यापूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. पक्षाचे शहरातील प्रमुख नेते नामदेव भगत यांनीही विधानसभा निवडणुकीत ज्यांनी विरोधात काम केले त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा हे पत्र हाच राजीनामा समजावा अशी भूमिका पक्षाच्या नेतृत्वाला कळविली आहे. यामुळे काँगे्रसमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभा निवडणुकीपर्यंत शहरात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे महत्त्व अचानक वाढले आहे. हा पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्यास अनेक पक्षांचे पदाधिकारी इच्छुक असल्याची चर्चा आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच एक मोठा झटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित मोठे मताधिक्य घेणाऱ्या शिवसेनेला मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्व शोधण्याची वेळ आली आहे. प्रमुख चार पक्षांमध्ये लवकरच मोठे बदल दिसणार असून ते कोणासाठी फायद्याचे व कोणासाठी तोट्याचे ठरतील ते महापालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.