Join us  

किस्सा कुर्सी का - धोंडग्याची गाडी, दिल्लीला धाडी; मुका घेणारा खासदार

By यदू जोशी | Published: April 09, 2024 9:54 AM

शेकापची निवडणूक निशाणी होती खटारा. लोक नारा देत, ‘धोंडग्याची गाडी, मुंबईला धाडी’. लोकसभेला उभे राहिले तेव्हा साहजिकच नारा आला,

यदु जोशी

आपल्या पक्षातला माणूस असो की विरोधी पक्षातला, आपला चाहता असो की घोर विरोधक दोघांनाही ते जवळ घेत आणि त्यांचा मुका घेत. शेतकरी कामगार पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील नेते केशवराव धोंडगे हे असे अजब व्यक्तिमत्त्व होते. ते सहावेळा आमदार होते आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात म्हणजे नांदेडमधून ते १९७७ मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांचा मुका प्रसिद्ध होता. १०१ व्या वर्षी ते गेले. त्यांच्या शतक महोत्सवाचे प्रमुख पाहुणे असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही त्यांनी मंचावरच मुका घेतला होता. 

शेकापची निवडणूक निशाणी होती खटारा. लोक नारा देत, ‘धोंडग्याची गाडी, मुंबईला धाडी’. लोकसभेला उभे राहिले तेव्हा साहजिकच नारा आला, ‘धोंडग्याची गाडी, दिल्लीला धाडी’. लोकांचे त्यांच्यावर निरातिशय प्रेम. आपल्या घरून भाजी-भाकरी बांधून आणत लोक त्यांच्या प्रचारात उतरत. ते स्वत: आणि कार्यकर्तेही मैलोगणती पायी फिरत प्रचार करायचे. आमदार असताना आणि खासदार झाले तेव्हाही विधानसभा, लोकसभेत कामकाजाच्या पहिल्या मिनिटाला ते येऊन बसत आणि सभागृहाचे कामकाज संपल्यानंतरच बाहेर पडत. ते मुलुखमैदानी तोफ होते. आवाजाची पट्टी वरची होती, रांगडे वागणेबोलणे, ग्रामीण ढंगाची भाषा, साधा वेश असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. कमरेखालची भाषा कधी वापरली नाही. हयातभर काँग्रेसच्या विरोधात राजकारण केले, पण कोणाविषयी आकस नाही बाळगला. पक्षाचा वेगळा पण त्यांचा स्वत:चा पण एक निवडणूक जाहीरनामा असायचा. त्याचे प्रकाशन ते कामगार, गुराखी यांच्या हातून करत. त्यांच्यासाठी लोकच पैसे गोळा करत, त्या काळी आचारसंहितेचा आजसारखा बडगा नव्हता. लोक त्यांना हार घालत अन् त्या हारातच निवडणुकीसाठीचा खर्च म्हणून नोटा बांधून देत.  कंधार-लोहादरम्यान गुराखी गडावर त्यांनी अनेक वर्षे अखिल भारतीय गुराखी साहित्य संमेलन, गुराखी लोकनाट्य संमेलने भरविली. जंगलाशी नाते असणारे गुराखी आदी लोक शिकले नाहीत, पण त्यांचेही मौखिक साहित्य आहे आणि ते किती प्रभावी आहे हे जगासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या असंख्य आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले.  

टॅग्स :निवडणूकलोकसभा निवडणूक २०२४मुंबईनांदेडखासदार