Join us

किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 09:43 IST

या प्रकरणात पोलिस कारवाई व अटक टाळण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी ॲड्. राहुल अरोटे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.

मुंबई : जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला असून, पेडणेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त न्यायाधीश एस. बी. जोशी यांनी फेटाळून लावला आहे. पेडणेकर यांच्यासह वेदांता प्रा. लिमिटेड कंपनीचा संचालक तसेच ठेकेदार सतीश कन्हैयालाल यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात बॉडी बॅगची जादा दराने खरेदी, त्यातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध आयपीसी कलम ४२० (फसवणूक), १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे) याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिस कारवाई व अटक टाळण्यासाठी किशोरी पेडणेकर यांनी ॲड्. राहुल अरोटे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.

किशोरी पेडणेकर, वेदांता इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड व इतर पक्षकारांचे म्हणणे ऐकून झाल्यानंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता, तसेच राज्य सरकारने या याचिकेला जोरदार विरोध करत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली होती. या सर्व सुनावणीअंती न्यायालयाने कोणतीही कारवाई करू नये, असे पोलिसांना निर्देश दिले होते. 

टॅग्स :किशोरी पेडणेकर