Join us  

Kirit Somaiya Sanjay Raut: “टॉयलेट घोटाळ्यामुळे बदनामी, संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा करणार”: किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 2:06 PM

Kirit Somaiya Sanjay Raut: कोणत्या आधारावर १०० कोटींचा घोटाळा झाला, असा सवाल करत, हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीनही सरकारची आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबई: आताच्या घडीला महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातही शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmee Thackeray) यांच्यासह अनेक शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांवर आरोपांची झोड उठवली. शिवसेनेकडूनही याला प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, टॉयलेट घोटाळ्याच्या नावाखाली बदनामी झाली असून, संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. 

संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणात सोमय्या हे संजय राऊतांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल करणार आहेत. मेधा सोमय्या १८ मे रोजी सकाळी ११ वाजता शिवडी कोर्ट मुंबई येथे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल भारतीय दंड सहिता ४९९, ५०० अंतर्गत फौजदारी मानहानीचा दावा/तक्रार दाखल करणार आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्विटही केले आहे. 

बदनाम करण्यासाठी अपप्रचार केला आहे

संजय राऊत यांना मानहानी, बदनामीची नोटीस देण्यात आली आहे. मुलुंड पोलिस स्टेशन येथे तक्रार ही दाखल केली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/ कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर १०० कोटींचा घोटाळा झाला, असा सवाल करत, हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीन देखील सरकारची आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. 

नेमका काय आहे हा घोटाळा?

मीरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडे तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरू केली आहे. महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी १८ मार्च २०२१ रोजी शासनाला अहवाल सादर केला आहे.  

टॅग्स :किरीट सोमय्यासंजय राऊत