‘लालबागचा राजा’ दर्शनास सेलीब्रिटींची गर्दी!

By Admin | Updated: September 7, 2016 03:23 IST2016-09-07T03:23:12+5:302016-09-07T03:23:12+5:30

मुंबईतील नामांकित गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘लालबागचा राजा’च्या चरणी सेलीब्रिटींची गर्दी यंदाही कायम आहे

'King of Lalbagh' celebration celebrity crowd! | ‘लालबागचा राजा’ दर्शनास सेलीब्रिटींची गर्दी!

‘लालबागचा राजा’ दर्शनास सेलीब्रिटींची गर्दी!

मुंबई : मुंबईतील नामांकित गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘लालबागचा राजा’च्या चरणी सेलीब्रिटींची गर्दी यंदाही कायम आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांना यंदा दर्शनासाठी विशेष वेळ देण्याचा निर्णय उत्सव मंडळाने घेतला आहे.
मंगळवारी दुपारी ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी मुलगी एकता कपूरसह ‘राजा’चे दर्शन घेतले. तर राजाच्या सायंकाळच्या आरतीचा मान बिग बी अमिताभ बच्चन यांना मिळाला. दरम्यान, अनेक सेलीब्रिटींकडून यंदाही राजाच्या आशीर्वादासाठी गर्दी केली जात आहे. राजकीय व्यक्तीही यामध्ये मागे नाहीत. अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव गुरुदास कामत आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी सहकुटुंब राजाचे दर्शन घेतले. बुधवारी दुपारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे राजाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मुंबईच्या डबेवाल्यांनाही राजाच्या विशेष दर्शनाची सोय यंदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने एक महिना आधी उत्सव मंडळाला विशेष वेळ देण्याची मागणी केली होती. ती मान्य करत उत्सव मंडळाने डबेवाल्यांना ‘लालबागचा राजा’च्या दर्शनास गुरुवारी, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताची वेळ दिली आहे. या वेळेत डबेवाला मंडळाच्या सभासदांनी ‘लालबागचा राजा’चे दर्शन घ्यावे, अशी विनंती डबेवाला मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी केली आहे.

Web Title: 'King of Lalbagh' celebration celebrity crowd!