Join us

प्रेयसीबाबत वाईट बोलल्याच्या रागात मित्राची हत्या; एटीएम कार्डने ओळख अन आरोपीला दिव्यातून बेड्या

By मनीषा म्हात्रे | Updated: April 22, 2024 18:55 IST

या हल्ल्यात श्रवण साळवे या मुलाची हत्या करण्यात आली आहे. तो संजय गांधी नगर परिसरात राहण्यास होता. गुरवही याच परिसरात राहण्यास होता. दोघांमध्ये मैत्री होती.

मुंबई : प्रेयसीबाबत सतत वाईट बोलत असल्याच्या रागात मित्रानेच अल्पवयीन मित्राची सळई भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आली. गुन्हे शाखेने आरोपीला दिव्यातून अटक केली आहे. ऋषिकेश गुरव (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

      या हल्ल्यात श्रवण साळवे या मुलाची हत्या करण्यात आली आहे. तो संजय गांधी नगर परिसरात राहण्यास होता. गुरवही याच परिसरात राहण्यास होता. दोघांमध्ये मैत्री होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच गुरव दिव्याला राहण्यास गेला. गुरवची प्रेयसी देखील घाटकोपर मध्ये राहते. तिला भेटण्यासाठी तो या परिसरात यायचा. श्रवणसोबत भेट होताच तो नेहमी त्याला प्रेयसी बाबत वाईट बोलून तिच्यापासून लांब राहण्याचा सल्ला द्यायचा. रविवारी नेहमीप्रमाणेच सायंकाळी दोघांनी सिगारेट ओढून चालत सूर्यमुखी साईबाबा मंदिराकडे आले. 

    तेथे, खाली पडलेली सळई उचलून त्याने श्रवण च्या पोटात १० ते १२ वेळा घुसवून पसार झाला.  मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची गर्दी लागताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलाला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

    याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला. श्रवणच्या खिशातील एटीएम कार्ड त्याची ओळख पटली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही याचा समांतर तपास सुरू केला. घाटकोपर कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी 

आत्माजी सावंत, रामदास कदम, स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर, तानाजी उबाळे आणि अंमलदरांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला एका मित्राच्या घरातून अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. 

हत्येनंतर मित्राच्या अंत्ययात्रेत

श्रवणची हत्या केल्यानंतर कुणाला संशय येवू नये म्हणून गुरव त्याच्या घरीही जावून आला होता. 

टॅग्स :गुन्हेगारी