युकेतील हत्याकांडाचा आरोपीला पकडले
By Admin | Updated: January 10, 2015 02:06 IST2015-01-10T02:06:08+5:302015-01-10T02:06:08+5:30
युकेतील ग्लास्को शहरात १९९७मध्ये एका तरूणीची निर्घृण हत्या करणाऱ्या विकृत तरूणाला मुंबई गुन्हे शाखा, प्रत्यार्पण कक्षाच्या महिला निरिक्षक शालिनी शर्मा व पथकाने मालडमधून अटक केली.

युकेतील हत्याकांडाचा आरोपीला पकडले
मुंबई : युकेतील ग्लास्को शहरात १९९७मध्ये एका तरूणीची निर्घृण हत्या करणाऱ्या विकृत तरूणाला मुंबई गुन्हे शाखा, प्रत्यार्पण कक्षाच्या महिला निरिक्षक शालिनी शर्मा व पथकाने मालडमधून अटक केली. शौगत मुखर्जी असे या आरोपी तरूणाचे नाव असून १९९७मध्ये तो मर्चंट नेव्हीच्या डिप्लोमासाठी ग्लास्गोला गेला होता. युके प्रशासनाच्या विनंतीवरून या पथकाने मुखर्जीचा ठावठिकाणा शोधून चार महिने त्याच्यावर पाळत ठेवली होती.
ग्लास्गोतील वास्तव्यात विकृत मुखर्जीविरोधात तीन गुन्हे दाखल झाले होत. सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथून करणे, अश्लिल अंगविक्षेप करणे, नग्नावस्थेत भटकणे अशाप्रकारचे ते गुन्हे होते. तर २४ नोव्हेंबर १९९७ रोजी शहरात शिक्षणासाठी आलेल्या ट्रेसी व्हायोलेट या तरूणीची संशयास्पदरित्या हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांना सीसीटीव्हीत भारतीय तरूण दिसत होता. चौकशीतून संशयाची सुई मुखर्जीवर होती. मात्र ठोस पुरावे मिळत नसल्याने पोलीस त्याला अटक करत नव्हते. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावणे धाडताच सर्व गाशा गुंडाळून मुखर्जी भारतात पळून आला. तेव्हापासून स्कॉटलंड पोली मुखर्जीचा शोध घेत होते.
२०१३मध्ये स्कॉटलंड पोलिसांना मुखर्जीविरोधात पुरावे सापडले. त्यानंतर त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली. युके प्रशासनाने भारताकडे मुखर्जीचा शोध घेण्याची विनंतीही केली. ही जबाबदारी गुन्हेशाखेकडे सोपविली. सहआयुक्त सदानंद दाते, उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला निरिक्षक शर्मा आणि त्यांच्या पथकाने खबऱ्यांचे जाळे, तांत्रिक तपासाच्या जोरावर मुखर्जीचा माग काढलाच. तो मालाड परिसरात आपल्या पत्नीसोबत राहात होता. ग्लास्गो न्यायालयाचे अटक वॉरंट हाती पडताच शर्मा आणि पथकाने मुखर्जीच्या मुसक्या आवळल्या. मुखर्जीला दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. तसेच ही बाब केंद्र शासनाला कळविली आहे.(प्रतिनिधी)
अल्कोहोलीक मुखर्जी
मुखर्जी हा पूर्णपणे दारूच्या आहारी होता. ओएनजीसीतून निवृत्त झालेल्या वडलांनी त्याला शिक्षणासाठी ग्लास्गोला धाडले. तेथेही तो दारूच्याच नशेत असे. तसेच त्याला वेश्यागमनाचीही सवय होती. हत्या झालेली तरूणी हीही वेश्याव्यवसाय करत असावी, असा अंदाज गुन्हे शाखेकडून व्यक्त होत आहे. तिच्या हत्येनंतर भारतात आलेल्या मुखर्जीने विवाह केला. दारूची नशा सुटली नव्हती. पाच वर्षे तो मलेशियात होता. तेथून मुंबईत परतल्यानंतर मात्र त्याने दारू सोडण्यासाठी धडपड केली.