Join us

बोनस ऐवजी दिला मार; मुकादमाविरुद्ध कामगाराची पोलिसांत तक्रार

By धीरज परब | Updated: November 13, 2023 23:06 IST

रविवारी दुपारी तो घरी असताना मुकादम यामिन रजू मंडल व त्याची बहीण तमन्ना हे कामगारांना दिवाळीचा बोनस व भेटवस्तू देत असल्याचे समजले

मीरारोड -  मुकादम हा दिवाळीचा बोनस कामगारांना वाटत असल्याचे पाहून त्याच्या कडे काम करणारा एक कामगार बोनस साठी गेला असता त्याला बोनस न देता उलट बेदम मारहाण केल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे. शांतिपार्क, बालाजी हॉटेल मागे म्हाडा वसाहत येथे झोपड्या असून तेथे बाकीबुल्ला मंडल ( २१ ) हा कुटुंबासह राहतो . तो बांधकाम साईट वर साफसफाई आदी मुकादम सांगेल तसे मजुरी काम करतो . त्याला मूळव्याधीचा त्रास जास्त झाल्याने गेले काही दिवस त्याला काम करता येत नव्हते . त्याने गावी जाण्यासाठी मुकादम कडे पैसे देखील मागितले होते. 

रविवारी दुपारी तो घरी असताना मुकादम यामिन रजू मंडल व त्याची बहीण तमन्ना हे कामगारांना दिवाळीचा बोनस व भेटवस्तू देत असल्याचे समजले. तो बोनस मागण्यासाठी गेला असता यामिन ह्याने बोनस मिळणार नाही असे सांगून त्याला धक्का मारला. तसेच दिवाळी भेट म्हणून वाटत असलेल्या हातातील डब्याने बाकीबुल्ला ह्याच्या डोक्यात मारले . त्याच्यासह त्याची बहीण तमन्ना व मित्र अल्लाउद्दीन यांनी देखील मारहाण केल्याने काशीमीरा पोलिसांनी रविवारी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत .

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी