Join us

जामिनावरील आरोपीच निघाला किडनी तस्कर, सहार पोलिसांची कारवाई; साथीदार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:43 IST

किडनी तस्करीप्रकरणात जामिनावर असलेल्या सुरेश प्रजापती याला गुरुवारी सहार पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई : किडनी तस्करीप्रकरणात जामिनावर असलेल्या सुरेश प्रजापती याला गुरुवारी सहार पोलिसांनी ताब्यात घेतले. जामिनावर असलेल्या प्रजापतीने आपल्या हस्तकांच्या मार्फत किडनी तस्करीचे प्रकार चालू ठेवले होते. या प्रकरणात प्रजापतीच्या अन्य फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.किडनी तस्करीप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच निझामुद्दिन नावाच्या व्यक्तीला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर निझामुद्दिनने सुरेश प्रजापतीच्या सहकार्याने तस्करी करत असल्याची कबुली दिली. त्याच्या जबाबानंतर पोलिसांनी प्रजापतीलाही ताब्यात घेतले. विशेष म्हणजे जानेवारी २०१६मध्ये हैदराबाद पोलिसांनी किडनी तस्करीचे रॅकेट उघडकीस आणत प्रजापतीला अटक केली होती. तब्बल ७० भारतीयांना किडनी तस्करीसाठी प्रजापतीने श्रीलंकेची राजधानी कोलंबोला धाडले होते. मात्र, अलीकडेच तो जामिनावर तुरुंगाबाहेर होता. मात्र, तुरुंगाबाहेर आल्यावर प्रजापती तस्करी करत असल्याचे निझामुद्दिनच्या कबुलीने उघड झाल्यानंतर पोलिसांनी प्रजापतीला ताब्यात घेतले.पैशांची नड असलेल्या व्यक्तींना किडनी दान करण्यासाठी तयार करून त्यांना परदेशातील गरजूंकडे पाठवायचे. त्या बदल्यात पन्नास लाखांपर्यंतची रक्कम उकळायची, असा प्रकार प्रजापतीने चालविला होता. यात निझामुद्दिन त्याला मदत करत असे, अशी माहिती तपास अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :गुन्हामुंबई पोलीस