नोकरानेच केले मालकाच्या मुलाचे अपहरण
By Admin | Updated: February 1, 2015 01:49 IST2015-02-01T01:49:58+5:302015-02-01T01:49:58+5:30
हॉटेल व्यावसायिकाच्या चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या नोकराला कांदिवली पोलिसांनी गजाआड केले. तसेच अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली.

नोकरानेच केले मालकाच्या मुलाचे अपहरण
मुंबई : हॉटेल व्यावसायिकाच्या चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या नोकराला कांदिवली पोलिसांनी गजाआड केले. तसेच अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली. मालकाने पगार थकविला होत़ त्याला अद्दल घडविण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली.
कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाड्यातून कामरान खान (४) याचे २४ जानेवारीला अपहरण झाले. हॉटेल व्यावसायिक असलेल्या काफिल खान यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार एपीआय प्रदीप केसरकर यांनी तपास सुरू केला.
चौकशीत काफिल यांनी व्यवसायात नुकसान झाल्याने हॉटेलमधील नोकरांचे पगार थकवले होते, अशी माहिती केसरकर यांना चौकशीत मिळाली. तोच धागा पकडून पथकाने हॉटेलमध्ये काम केलेल्या नोकरांचा शोध घेतला. त्यात अस्लम व जुबेर हे कर्मचारी गायब होते. त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला. दोघांची शोधाशोध सुरू झाली. २२ जानेवारीला अस्लम गणेशनगर परिसरात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपशील तपासला असता, तो २५ तारखेला उत्तर प्रदेश येथील राहत्या घरी जात असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे कांदिवली पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेश येथील बाहराईच जिल्ह्यातील मोतीपूर येथे रवाना झाले. मोतीपूर पोलिसांच्या मदतीने कांदिवली पोलिसांनी अस्लमला नेपाळ बॉर्डर येथून ताब्यात घेतले. तसेच अपहृत कामरानची सुटका केली.
तपासात मुलाच्या वडिलाने त्याचे ४५ हजार रुपये पगार थकविल्याने त्याने मुलाचे अपहरण केल्याचे कबूल केले. अपहरणाच्या गुन्ह्यात अस्लमला अटक केली. या कारवाईत कांदिवली पोलीस ठाण्याचे पीएसआय ठोके, सहायक फौजदार पोपट जाधव, शिपाई संतोष देसाई आदी सहभागी होते. शनिवारी सकाळी मुलाला पालकांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)