खोपोली नगराध्यक्ष अडचणीत

By Admin | Updated: June 29, 2015 22:38 IST2015-06-29T22:38:32+5:302015-06-29T22:38:32+5:30

खोपोली नगर पालिकेचा अजब कारभार वारंवार समोर येत असतानाच जलकुंभ दुरु स्तीच्या कामासाठी नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदाराला काम दिल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

Khopoli municipality president faces trouble | खोपोली नगराध्यक्ष अडचणीत

खोपोली नगराध्यक्ष अडचणीत

खालापूर : खोपोली नगर पालिकेचा अजब कारभार वारंवार समोर येत असतानाच जलकुंभ दुरुस्तीच्या कामासाठी नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदाराला काम दिल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. नगराध्यक्षांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील अधिकार वापरून नियमबाह्य कामाचे वाटप नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदाराला देवून बिल अदा केल्याने नगराध्यक्ष अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकरणात जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
खोपोली नगर पालिका हद्दीतील काजूवाडी येथील जलकुंभातून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी जलकुंभ क्र मांक दोन उभारण्यात आले आहे. हे जलकुंभ जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने २१ जून २०१४ ला मुख्याधिकारी यांनी कार्यालयीन टिपणी सादर करताना जलकुंभाला ३८ वर्षे झाली असून जलकुंभाची तातडीने दुरुस्ती झाली नाही तर तो कोसळण्याची भीती असल्याचे म्हटले आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी हा धोका लक्षात घेवून पुढील अनर्थ टाळण्यासाठी, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काम जलद होणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले होते. तांत्रिक मंजुरी मिळण्यास वेळ लागणार असल्याने अध्यक्षांनी खास बाब म्हणून ५८(२)नुसार टाकीचे काम करण्यास हरकत नसून शहरातील तेजस कन्स्ट्रक्शन कंपनीला काम मिळण्याची विनंती केली होती.
२ आॅगस्ट २०१४ च्या सर्वसाधारण सभेत या विषयाचा ठराव मंजूर करून तातडीने नगराध्यक्षांनी ७.५० दशलक्ष पाणीसाठा करणाऱ्या जलकुंभाची
दुरु स्ती व देखभालचे काम मे.तेजस कन्स्ट्रक्शन कंपनी खोपोलीला दिले. नगराध्यक्षांनी अधिकार वापरून मर्जीतल्या ठेकेदाराला काम दिले. संबंधित ठेकेदाराला काम देताना त्याच्याकडून पालिकेने कसलेही नोंदणीकृत ठेकेदार प्रमाणपत्र न घेता काम दिल्याचे माहिती अधिकारात उघड झाल्याने या कामात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे. (वार्ताहर )

अधिकारचा गैरवापर
-५८(२) चा गैरवापर या आधीही झालेला आहे. दिवंगत माजी नगराध्यक्ष प्रकाश मिरकुटे आणि माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांनी अशाच प्रकारे आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर कारवाई झाली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी तर नगर विकास विभाग काय कारवाई करते हे लवकरच समोर येणार आहे . ज्या ठेकेदाराला काम दिले आहे त्याची नोंदणी प्रमाणपत्राची मुदत १६ जून २०१४ला संपली असून अद्यापपर्यंत त्याचे नूतनीकरण झाले नाही.

बिले थांबवून नव्याने निविदा मागविल्या
- ही गंभीर बाब माहिती अधिकारात उघड झाल्याची कुणकुण पालिका प्रशासनास लागताच अशा प्रकारे अन्य कामांमधील बिले थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर अलीकडे शहरातील वेगवेगळ्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करून मागविण्यात आल्या असताना मोठ्या प्रमाणात ठेकेदारांकडे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने पालिका प्रशासनाने नव्याने निविदा मागविल्या आहेत. तर २३ जूनला संपन्न झालेल्या तहकूब सर्वसाधारण सभेत याच तेजस कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निविदाही नामंजूर करण्यात आल्या आहेत.

खोपोली नगर पालिकेत अनागोंदी कारभार ही पालिकेची परंपरा झाली आहे. माहिती अधिकारात उघड झालेला प्रकार पाहता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून नगराध्यक्ष दोषी असतील तर कारवाई व्हावी. अशा प्रकारे कामाचे वाटप करता येत नाही. या कामात गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे.
-तुकाराम साबळे,
विरोधी पक्षनेता, खोपोली

५८ (२) नुसार तातडीचे काम करताना निविदा न काढता नगराध्यक्षाला आपल्या अधिकारात काम देता येते. काम करणारा ठेकेदार नोंदणीकृत असलाच पाहिजे असाही काही नियम नाही. त्यामुळे मी कोणतेही चुकीचे काम केले नाही. पाणीपुरवठ्यासारखा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यानेच अधिकारात सदर कामाला मंजुरी दिली होती.
-दत्तात्रेय मसुरकर, नगराध्यक्ष, खोपोली

Web Title: Khopoli municipality president faces trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.