खारटन खाडीकिनारी विसर्जन घाट
By Admin | Updated: July 7, 2015 00:19 IST2015-07-07T00:19:19+5:302015-07-07T00:19:19+5:30
कळवा चौक खाडीकिनारी विकसित केलेल्या नक्षत्रवन आणि विसर्जन घाटाच्या धर्तीवर खारटन रोड खाडीत विसर्जन घाट आणि उद्यान विकसित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल

खारटन खाडीकिनारी विसर्जन घाट
ठाणे : कळवा चौक खाडीकिनारी विकसित केलेल्या नक्षत्रवन आणि विसर्जन घाटाच्या धर्तीवर खारटन रोड खाडीत विसर्जन घाट आणि उद्यान विकसित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिले.
कळवा प्रभाग समितीअंतर्गत प्रभाग क्र मांक ४६ मधील विविध ठिकाणी शनिवारी सायंकाळी भेट देऊन आयुक्तांनी पाहणी केली. या भेटीत त्यांनी कळवा नाक्यावरील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मार्केटला भेट देऊन तिथे आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे गावदेवी मैदान विकसित करून तेथील शौचालयांच्या साफसफाईचे काम एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडे द्यावे, जेणेकरून तिथे कायम स्वच्छता राहील. याचदरम्यान, बुधाजीनगरमधून स्टेशनकडे जाणारा डीपी रोड पूर्ण करण्याबाबत सूचना देतानाच त्यावरील बाधित होणारी बांधकामे हटवून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
या प्रभागातील अनधिकृत बांधकामांविषयी अर्धवट तोडलेल्या अतिधोकादायक इमारती पूर्णत: तोडण्याचे तसेच शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडावर झालेले अतिक्रमण हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच कळवा चौक
खाडीलगत बांधलेल्या नक्षत्रवन
आणि विसर्जन घाटास भेट देऊन त्यांनी त्याच धर्तीवर समोरच्या बाजूला खारटन रोड खाडीजवळही उद्यान आणि विसर्जन घाट निर्माण करण्यास सांगितले.
या वेळी आयुक्तांसोबत उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसमोल, स्थानिक नगरसेवक मुकुंद केणी व प्रमिला केणी आदी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)