खारघर टोलवर धडक
By Admin | Updated: January 9, 2015 01:27 IST2015-01-09T01:27:05+5:302015-01-09T01:27:05+5:30
शीव-पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाका रद्द करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने गुरुवारी तीव्र आंदोलन केले.

खारघर टोलवर धडक
नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाका रद्द करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने गुरुवारी तीव्र आंदोलन केले. भाजपा सरकारचा निषेध करून तत्काळ टोल रद्द करण्याची मागणी या वेळी केली. तीन दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास रायगड जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
खारघर टोलनाक्याविरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. टोल रद्द करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारनेच टोल लादल्यामुळे नागरिकांमधील नाराजी वाढली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी खारघर टोलनाक्यावर धडक दिली. घोषणाबाजी करून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात गेलेल्या प्रशांत ठाकूर यांना ‘आता राजीनामा द्याच,’ असे आव्हान या वेळी देण्यात आले. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगितले की, टोलचा प्रश्न सुटेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. सरकारने खारघर टोलबाबत तीन दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपूर्ण रायगड जिल्ह्यातील टोलनाक्यांवर शेकाप आंदोलन करेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
आंदोलन सुरू असेपर्यंत टोलनाक्यावरील कार्यालय बंद ठेवून टोल घेणे बंद करण्यात आले होते. ‘पोलिसांनी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून, दिलेल्या निर्देशामुळेच आम्ही आंदोलनादरम्यान टोलमधून सूट दिली होती,’ अशी प्रतिक्रिया ‘सायन पनवेल टोलवेज प्रा.लि.’चे जनसंपर्क अधिकारी उमेश सोनावणे यांनी दिली. अवजड वाहने दोन्ही मार्गांवरील पर्यायी मार्गाने वळविली होती. त्यामुळे आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी झाली नाही.
शेकापचे नेते विवेक पाटील यांनीदेखील आंदोलनादरम्यान वाहनचालकांना न अडवण्याचे निर्देश दिले होते. आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश आगवणे व पनवेलचे तहसीलदार पवन चांडक यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी आमदार पंडित पाटील, माजी आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, राजेंद्र पाटील, रवीशेठ पाटील, काशिनाथ पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आंदोलन संपताच टोल सुरू : आंदोलनादरम्यान अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी टोल न घेण्याची सूचना एसपीटीपीएलच्या व्यवस्थापनास केली होती. यामुळे दुपारपर्यंत टोल बंद होता. यामुळे सर्वच वाहनधारकांना विनाटोल प्रवास करता आला. परंतु आंदोलन संपताच टोल वसुली पुन्हा सुरू करण्यात आली.
पोलीस छावणीचे स्वरूप
आंदोलनादरम्यान खारघर टोलनाक्याला पोलीस छावणीचे रूप आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी परिमंडळ २चे उपायुक्त संजय ऐनपुरे, वाहतूक उपायुक्त अरविंद साळवे यांच्यासह २५० पोलीस कर्मचारी, ४० पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कचऱ्याचे साम्राज्य
टोलविरोधात आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीकचे ग्लास व इतर कचरा महामार्गावरच टाकला होता. यामुळे आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात कचरा झाला होता. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.