खारघर झाला कोंडीनाका
By Admin | Updated: January 8, 2015 00:40 IST2015-01-08T00:40:38+5:302015-01-08T00:40:38+5:30
नुकताच सुरू झालेला खारघर टोलनाका कामोठे, खारघर या दोन्ही टोल प्लाझावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे देखील चर्चेत आला आहे.

खारघर झाला कोंडीनाका
नवी मुंबई : नुकताच सुरू झालेला खारघर टोलनाका कामोठे, खारघर या दोन्ही टोल प्लाझावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे देखील चर्चेत आला आहे. टोलनाक्यावर सुमारे दोन किलोमीटरची वाहतूक कोंडी पाहता या वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेल्या अवजड वाहनांवर सकाळी व सायंकाळी बंदी घालण्याची मागणी या वाहतूक कोंडीत बळी पडत असलेल्या वाहनचालकांनी केली आहे.
पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. सायन-पनवेल मार्गावरुन दररोज हजारो वाहने कामानिमित्त मुंबईला जातात . सकाळी ही संख्या मोठी असते. याच वेळेला अवजड वाहनांच्या टोलनाक्यावर लागलेल्या लांबच लांब रांगा या लहान वाहनांना अडथळा निर्माण करतात . नेमकी सकाळी, सायंकाळी ही गर्दी वाढत जात असून कामावरुन ये-जा करताना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालून यावेळेकरिता पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यासंदर्भात वाहतूक विभागाने विचार करावा अशी मागणी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून केली जात आहे . या वाहतूक कोंडीचा फटका खाजगी वाहनांसह एनएमएमटीच्या बस, एसटी बस यांना बसत आहे त्यामुळे चाकरमान्यांना देखील कामावर वेळेवर पोहचण्यास शक्य होत नाही. (प्रतिनिधी)
अवजड वाहने व चारचाकी वाहने या दोन्हीसाठी वेगवेगळ्या लेन उभारण्यासंदर्भात आम्ही सूचना दिल्या होत्या. त्या लेनचा वापर अवजड वाहन चालकांनी करण्याची आवश्यकता आहे. ते नियम पाळल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल.
- अरविंद साळवे, वाहतूक पोलीस उपायुक्त, नवी मुंबई
टोलनाक्याजवळ गाडीला आग
नवी मुंबई : खारघर टोलनाक्यासमोर कोपरा गावाजवळ मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झायलो गाडीने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. पुण्यावरून प्रवासी वाहतूक करणारी ही गाडी मुंबईकडे जात असताना गरम झाल्याने गाडीने पेट घेतला. खारघर अग्निशमन दलाच्या एका बंबाच्या सह्याने आग विझवली. मात्र या अपघातात संपूर्ण गाडी जळून खाक झाली. घटनास्थळी वाहनचालक उपस्थित नसल्यामुळे याबाबत माहिती मिळू शकली नाही.
‘शेकाप’ची आज टोल नाक्याला धडक
१खारघर टोल नाक्यावर पनवेल तालुक्यातील सर्व वाहनांना माफी मिळाली पाहिजे, त्याकरिता शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार ८ जानेवारी रोजी खारघर टोल नाक्यावर आंदोलन करण्याचा निर्णय शेकापने घेतला आहे. यावेळी आ. धैर्यशील पाटील, आ. पंडीत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळाराम पाटील, मीनाक्षी पाटील, महेंद्र थोरवे ही शेकाप नेत्यांची लालफौज उपस्थित राहणारे आहे.
२सकाळी १० वा. आम्ही टोल नाका रोखणार असून या ठिकाणची वसुली बंद करणार आहे. जोपर्यंत टोल वसुली बंद करण्याचा निर्णय शासन घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे शेकाप जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी सांगितले. शासनाकडून अतिशय अन्यायाकारकरित्या टोल वसुली होत आहे. त्याचा निषेध म्हणून आंदोलन करीत असून गुन्हे दाखल करावे असे शेकापने म्हटले आहे.
बंदोबस्त वाढवला
शेतकरी कामगार पक्षाचे टोल बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त संजयसिंह येणपुरे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ४०० पोलीस कर्मचारी, अधिकारी टोल नाक्यावर तैनात ठेवण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त दंगल नियंत्रक पथक, शिघ्र कृती दल, एसआरपी, स्ट्रायकिंग फोर्सही बोलाविण्यात आल्याचे येणपुरे यांनी लोकमतला सांगितले.