Join us

घाटकोपर येथील खंडोबा मंदिराचा होणार कायापालट; तीन कोटी रुपयांची तरतूद  

By स्नेहा मोरे | Updated: January 30, 2024 18:16 IST

या संपूर्ण मंदिराचा कायापालट प्रति जेजुरी म्हणून करण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:  पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत २०२३-२४ मध्ये घाटकोपर येथील खंडोबा मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाकडून तब्बल तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच वितरीत करण्यात येणार आहे, अशा सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. घाटकोपर येथील टेकडीवर असणाऱ्या या संपूर्ण मंदिराचा कायापालट प्रति जेजुरी म्हणून करण्यात येणार आहे. 

घाटकोपर येथील खंडोबा मंदिराच्या टेकडी परिसरात पर्यटनाच्या दृष्टीने सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी सेल्फी पॉइंट, भाविकांसाठी शौचालय बांधणे, पाण्याची व्यवस्था , भाविकांसाठी बाकडे बांधणे, मंदिराच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी मुंबईच्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला विशेष यंत्रणा राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यात ही कामे दर्जेदार स्वरुपाची व्हावीत, याकरीता विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्थापत्य विशारदांची नेमणूक करुन प्रत्यक्ष कामे कंत्राटदारांच्या माध्यमातून करावीत असे म्हटले आहे. 

त्याचप्रमाणे , या मंदिरासाठी निश्चित केलेल्या प्रशासकीय आणि वित्तीय मान्यतेपेक्षा कोणत्याही परिस्थितीत मंजूर अनुदानापेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पर्यटन विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून केलेल्या कामाच्या ठिकाणी पर्यटन विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून केली असल्याबाबतचे फलक लावण्यात यावेत. या कामाच्या पूर्णत्वानंतर त्या संदर्भातील देखभाल दुरुस्ती, संबंधित संस्थेने करण्यासंदर्भात संचालक, पर्यटन संचालनालय व संबंधित जिल्हाधिका-यांनी संबंधित देवस्थान , संस्थेबरोबर करारनामा करणे बंधनकारक राहील. काम पूर्ण झाल्यानंतर हे पर्यटक सुविधा तात्काळ उपयोगात आणण्याच्या दृष्टीने काम सुरु असतानाच पूर्व नियोजन करावे असेही शासन निर्णयात म्हटले आहे. 

टॅग्स :मंदिर