खालापूर-पालीफाटा वाहतूक ठप्प

By Admin | Updated: May 12, 2015 22:51 IST2015-05-12T22:51:14+5:302015-05-12T22:51:14+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, खालापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहत, अवजड वाहनांची वाहतूक, त्यातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने होणारी प्रवासी पर्यटकांची

Khalapur-Pilipatta traffic jam | खालापूर-पालीफाटा वाहतूक ठप्प

खालापूर-पालीफाटा वाहतूक ठप्प

अमोल पाटील, खालापूर
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, खालापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहत, अवजड वाहनांची वाहतूक, त्यातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने होणारी प्रवासी पर्यटकांची गर्दी यामुळे सध्या खालापूर-पालीफाटा परिसरात कायमच वाहतूक कोंडी होते. मात्र मंगळवारी या कोंडीने कहर केला. तब्बल दोन तास वाहतूक कोंडी न सुटल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी तर पायीच जाण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी उद्भवणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी यावेळी संतप्त प्रवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
खालापूर तालुक्यात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अवजड वाहनांची दिवसरात्र वाहतूक सुरू असते. सुट्टीचा हंगाम असल्याने मुंबई, पुण्यातील भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात पर्यटनासाठी दाखल होत आहेत. मात्र अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीवर ताण पडत आहे. खालापूरजवळील इमॅजिका पार्कमध्येही पर्यटकांची गर्दी होत असून एक्स्प्रेस-वेमधून एक्झिट होणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. मंगळवारी सकाळी एक ट्रक थेट रस्त्यामध्ये आडवे लागल्याने पालीफाटा येथे सकाळी साडेदहानंतर वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही कोंडी पुढे वाढतच गेली. याचा फटका पाली, पेण आणि खोपोली मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. त्यांना तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. एक्स्प्रेसपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने देवन्हावे, सारसन, वडवळपर्यंत रस्त्यांवर वाहने खोळंबली होती. बऱ्याच वेळानंतर याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनाही वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी कसरत करावी लागली.

Web Title: Khalapur-Pilipatta traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.