Join us  

'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 11:33 AM

नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले.

मुंबई - नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेत रूग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला. तसेच रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टरांकडून परिस्थितीची माहिती घेतली. तद्नंतर रूग्णालयातील स्वच्छतागृहांची पाहणी करताना घाण आढळून आल्याने संतापलेल्या खासदार पाटील यांनी अधिष्ठाता अन् अधिकाऱ्यांना तेथील टॉयलेट साफ करायला लावले होते. या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर, खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणावर आता अभिनेत्री केतकी चितळे हिने भाष्य केलं आहे. 

नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले. त्यामध्ये १६ नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ यांनीही रुग्णालयाला भेट दिली होती. तर, या घटनेनंतर रुग्णालयाची दयनीय अवस्था पाहून खासदार हेमंत पाटील यांनी चक्क रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना टॉयलेट स्वच्छ करायला लावले होते. या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन ॲट्रॉसिटी आणि शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हेमंत पाटील आणि अन्य १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर, भाष्य करताना केतकी चितळेने फेसबुक पोस्ट करत समान नागरी कायद्याची मागणी केली आहे. 

आता एका हॉस्पिटल डीनला, हॉस्पिटलमधील संडास साफ करा हे ही त्याची जात बघून सांगायचे तर. आणि तरीही राव आपल्याकडे खोट्या ॲट्रॉसिटी केसेस टाकल्या जात नाहीत, असे म्हणत खासदारांवर दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचं केतकीनं सुचवलं आहे. तसेच, जय हो Atrocities Act, 1989. आम्ही सामान्य माणासांवर काय, तर आता कुठल्या पदालाही नाही सोडणार, असे म्हणत केतकीने ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याचंच सूचवलंय. 

केतकीने सोशल मीडियावर पोस्टमध्ये समान नागरी कायदा आणि वन नेशन, वन लॉ हे हॅश टॅग वापरले आहेत. 

रुग्णालयाच्या डीनवरही गुन्हा दाखल

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघाले आहेत. याप्रकरणी शासनाने दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातच, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, डॉ. वाकोडे यांना टॉयलेट साफ करण्यास भाग पाडल्याने खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता, डॉ. वाकोडेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.  

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रकेतकी चितळेनांदेडहॉस्पिटलअॅट्रॉसिटी कायदा