कर्नाळा भूषण पुरस्कार वितरण

By Admin | Updated: December 31, 2014 22:50 IST2014-12-31T22:50:34+5:302014-12-31T22:50:34+5:30

भारतीय खेळांच्या विकासासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी ज्या पध्दतीने काम करीत आहे ते पहाता भविष्यात खेळावर प्रेम असणारे अनेक द्रोणाचार्य निर्माण होतील

Kernala Bhushan Award Distribution | कर्नाळा भूषण पुरस्कार वितरण

कर्नाळा भूषण पुरस्कार वितरण

पनवेल : भारतीय खेळांच्या विकासासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी ज्या पध्दतीने काम करीत आहे ते पहाता भविष्यात खेळावर प्रेम असणारे अनेक द्रोणाचार्य निर्माण होतील आणि त्यांच्याव्दारे अनेक अर्जुन तयार होतील. यातूनच माजी आमदार विवेक पाटील यांचे मिशन २०२० चे स्वप्न साकार होईल, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला. कर्नाळा स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १६व्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातील कर्नाळा भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विवेक पाटील यांची त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी निरगुडकर म्हणाले, प्रवेशव्दाराजवळ लावण्यात आलेले चित्रफलक हे कार्यसंस्कृतीचे द्योतक आहेत. भारतीय सत्यार्थी आणि पाकिस्तानी मलाला यांचे नोबेल पुरस्कार घेतानाचे एकत्रित फोटो हे दूरदृष्टीचे प्रतीक आहेत. तर माळीण गावच्या दुर्घटनेचे फोटो हे सामाजिक संवेदनेचे प्रतीक आहेत. केवळ कोणतेही मैदान थोर नसते तर त्या मैदानात प्रचंड कष्ट घेणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांच्या घामाने ती माती पुनित होते, अशी क्रीडासंस्कृती मातीत रूजविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. हे कार्य विवेक पाटील कर्नाळा स्पोटर््स अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून करीत आहेत असे वचन निरगुडकर यांनी दिले.
कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित १६व्या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये २०१४च्या कर्नाळा भूषण पुरस्कार वितरणाचा सोहळा रसरंग नाट्यगृहामध्ये संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाने उपस्थितांच्या डोळयाचे पारणे फेडले.
कर्नाळा भूषण पुरस्काराच्या माध्यमातून गुणवंतांचा शोध घेताना एक प्रकारची अनामिक ऊर्जा मिळाली. ही ऊर्जा समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवणे हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून घारापुरीच्या बेटापासून माथेरानच्या डोंगरापर्यंत असलेल्या पनवेल - उरण मतदार संघ क्षेत्रातील प्रभुतींना यापुढे सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे ‘पनवेल भूषण’ या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार यंदापासून ‘कर्नाळा भूषण’ या नावाने ओळखला जाणार असल्याचे मंदार दोंदे यांनी सांगितले.
कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी येथे १६वा कर्नाळा कला, क्रीडा महोत्सव सुरू आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बाळासाहेब म्हात्रे यांना, मानसिक दृष्टया व शारीरिक दृष्टया अपंग असणाऱ्या वृध्दांची सेवा करण्यासाठी शुश्रुषा केंद्र चालवणाऱ्या योजना घरत यांना समाजसेवेसाठी, तर डॉ. ययाती गांधी यांना वैद्यकीय सेवेतील योगदानाबद्दल कर्नाळा भूषण पुरस्कार देण्यात आला. कांतीलाल कडू यांना पत्रकारितेतील कारगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. (वार्ताहर)

निरगुडकरांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने आनंद व्दिगुणित
माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, उदय निरगुडकर यांनी पत्रकारिता करताना अपप्रवृत्तीच्या लोकांना धसका देणारे काम नेहमीच केले आहे. समाजाच्या अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम झी-२४ तास या वाहिनीच्या माध्यमातून ते करीत आहेत. कर्नाळा भूषण पुरस्कारप्राप्त प्रभूतींचा सन्मान त्यांच्या हस्ते होत आहे यातून या पुरस्कारप्राप्त गुणीजनांना अजूनही चांगले काम करण्याची नक्कीच स्फूर्ती मिळेल.

Web Title: Kernala Bhushan Award Distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.