केजरीवाल आज मुंबईतील न्यायालयात?
By Admin | Updated: December 5, 2015 09:08 IST2015-12-05T09:08:26+5:302015-12-05T09:08:26+5:30
गेल्या वर्षी आम आदमी पक्षाच्या (आप) रॅलीसंबंधी करण्यात आलेल्या तक्रारीबाबत आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी कुर्ला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहावे

केजरीवाल आज मुंबईतील न्यायालयात?
मुंबई : गेल्या वर्षी आम आदमी पक्षाच्या (आप) रॅलीसंबंधी करण्यात आलेल्या तक्रारीबाबत आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शनिवारी कुर्ला दंडाधिकाऱ्यांपुढे हजर राहावे लागणार आहे. दंडाधिकाऱ्यांपुढे उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात यावी, ही केजरीवालांची मागणी मान्य करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात आपने मानखुर्दमध्ये रॅली काढली. या रॅलीला केजरीवाल उपस्थित होते. मात्र ही रॅली काढण्यापूर्वी वाहतूक विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे केजरीवाल यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली. ही तक्रार रद्द करण्यात यावी आणि कुर्ला दंडाधिकाऱ्यांपुढे उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. आपचे अध्यक्ष म्हणून केजरीवाल यांच्यावरही परवानगीची जबाबदारी आहे, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने ही याचिका मागे घ्या आणि अनुपस्थित राहण्याची सवलत दंडाधिकाऱ्यांकडूनच मिळावी, असे म्हटले. त्यावर ‘शनिवारी त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहू द्या आणि त्यांच्याकडूनच कायमस्वरूपी हजर न राहण्याची परवानगी घ्या,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)