Join us  

सेवेत कायम करा ;अन्यथा काम बंद आंदोलन करू; बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:28 AM

बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत.

मुंबई :  बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. ‘समान काम समान वेतन’ बेस्टच्या सेवेत कायम समावून घेणे, कामाचे वेळापत्रक योग्य पद्धतीने तयार करणे यासाठी बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बसेस चालवणाऱ्या कंत्राटी कामगारांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वेळीच मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी कामगारांनी दिला आहे.

बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रमाचे कामगार घोषित करून उपक्रमाच्या आस्थापनेवर कायम करावे. जोपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या आस्थापनेवर कायम करण्यात येत नाही, तोपर्यंत ‘समान कामाला, समान वेतन’ या तत्त्वाचे पालन करून बेस्ट उपक्रमातील सुरुवातीच्या टप्प्यावरील कायम कामगाराचे वेतन, बोनस/सानुग्रह अनुदान व मोफत बस प्रवास, वैद्यकीय सुविधा, उपहारगृह, प्रसाधनगृह व इतर सर्व सेवा शर्ती लागू कराव्यात, सर्व महिला कामगार, कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा देण्यात याव्यात. त्यात कपडे बदलण्याची बंदिस्त जागा, स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवादाविरोधात समिती स्थापन करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

‘समान कामाला, समान वेतन’ या तत्त्वाप्रमाणे सेवेच्या प्रथम दिवसापासून बेस्ट उपक्रमाच्या कायम कामगारांना देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम या कामगारांना देय ठरवून त्याची पूर्ण थकबाकी देण्यात यावी, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले. ‘समान कामाला, समान वेतन’ बेस्ट उपक्रमाच्या कायम कामगारांना देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम कंत्राटी कामगारांना देय ठरवून पूर्ण थकबाकी द्यावी, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.

मागण्यांकडे वेधले लक्ष :

मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटी कामगारांनी कामगार भवन कार्यालयाबाहेर आंदोलन केले आणि कामगार आयुक्त व उप कामगार आयुक्तांना निवेदन दिले.

टॅग्स :मुंबईबेस्टसंप