केडीएमसीचा आयएएस अधिकारी राजकारण्यांनीच गमावला
By Admin | Updated: February 5, 2015 22:54 IST2015-02-05T22:54:12+5:302015-02-05T22:54:12+5:30
कल्याण-डोंबिवलीकरांना तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महापालिका आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी मिळाला होता.

केडीएमसीचा आयएएस अधिकारी राजकारण्यांनीच गमावला
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीकरांना तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महापालिका आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी मिळाला होता. मात्र राजकारण्यांची अंतर्गत धुसफूस व ‘हट्टा’पायी तो गमावावा लागला.
या शहरांमधील असंख्य गैरसोयींनी त्रस्त असलेल्या करदात्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. नागरिकांनी या संदर्भात आवाज उठवूनही त्यास एकाही पक्षाच्या लोकप्रतिनिधीने साथ दिली नसल्याने सर्वच राजकीय पक्षांना आयएएस अधिकारी नको होता की काय अशीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. गेल्याच महिन्यात पालघरचे उपजिल्हाधिकारी सुशील खोडवेकर यांना केडीएमसीच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती, मात्र आधी जि.प निवडणुकांच्या आचारसंहीतेचे कारण सांगत त्यांना या ठिकाणचा चार्ज घेता येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते, मात्र त्यानंतर शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत, आयएएस आयुक्त दिला तर मात्र ‘राजीनामास्त्र’ उगारण्यात येईल असे सांगितले, त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना विश्वासात घेत जरा धीर धरा असे सांगत, आयएएस अधिका-याऐवजी प्रमोटी अधिकारीच आयुक्तपदी नेमला. भाजपाच्या एका आमदारानेच हे सत्य ‘लोकमत’ला सांगितले.
सोनवणे मंत्रालयातच तळ ठोकून ?
आधीचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांनीही उरलेली अवघी दोन वर्षांचा सेवा याच महापालिकेत कार्यरत ठेवण्यासाठी प्रचंड कंबर कसली होती, सध्याही ते मंत्रालयातच तळ ठोकून असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला होता, असे त्यांनीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. मात्र त्या ठिकाणचा प्रयत्न सपशेल फेल ठरल्यावर त्यांनी आता त्या ठिकाणी वॉच ठेवला आहे.
भाजपाच्या स्थानिकांना हवा आयएएसच!
४या संदर्भात कल्याणचे स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सर्वात आधी पत्रकार परिषद घेऊन मीच या ठिकाणी आयएएस अधिकारी हवा अशी मागणी केली होती, त्यामुळे सध्याचे आयुक्त माझे स्नेही आहेत, आम्हीच त्यांना आणले या सर्व वृत्तांमध्ये काहीही तथ्य नसून मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही कामाला लागलो आहोत.
अर्दाड अवघे काही महिने ? नुकतेच नियुक्त झालेले आयुक्त अर्दाड हे अवघे काही महिन्यांसाठी आले असल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात आहे. त्यामुळेच ते थेट नागरिकांना भेटत नाहीत, लोकप्रतिनिधींनाही चर्चेत घेत नसल्याची चर्चा आहे. नागरिक तक्रार घेऊन गेल्यास पी.ए.ला भेटा असा सल्ला त्यांनी दिल्याचे डोंबिवलीकर सुप्रिया कुलकर्णी यांनी सांगितले.