केडीएमसीला हवाय पूर्ण वेळ आयुक्त
By Admin | Updated: June 5, 2014 22:58 IST2014-06-05T21:53:47+5:302014-06-05T22:58:01+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेत सद्यस्थितीला प्रभारी आयुक्त म्हणून श्यामसुंदर पाटील हे कार्यभार सांभाळत आहेत

केडीएमसीला हवाय पूर्ण वेळ आयुक्त
कल्याण -कल्याण डोंबिवली महापालिकेत सद्यस्थितीला प्रभारी आयुक्त म्हणून श्यामसुंदर पाटील हे कार्यभार सांभाळत आहेत मात्र महापालिकेला पुर्णवेळ आयुक्त मिळावा म्हणून दस्तूरखुद्द पालिकेच्या महापौर कल्याणी पाटील या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लवकरच भेट घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे योग्य पालन न केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन आयुक्त शंकर भिसे यांची पदावरून उचलबांगडी करून त्यांचा पदभार प्रभारी आयुक्त म्हणून ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्याकडे सोपविला आहे. आधीच पालिकेत अधिका-यांची वानवा असल्याने अनेक विभागांमध्ये प्रभारी नेमले गेले असताना त्यात आयुक्तांचीही प्रभारी म्हणून भर पडली आहे. पाटील यांची नियुक्ती होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापपर्यंत पूर्णवेळ आयुक्त केडीएमसीसाठी देण्यात आलेला नाही. प्रभारी आयुक्तांमुळे ठोस निर्णय घेतले जात नाहीत, त्यामुळे याचा परिणाम विकासकामांवर होत असल्याचे महापौरांचे म्हणणे आहे. गेल्या १० महिन्यांपासून सहाय्यक संचालक नगररचना पद हे देखील प्रभारी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले असून केडीएमसीत शिवसेना भाजपा युतीची सत्ता असल्याने राज्य शासन जाणूनबुजुन पूर्णवेळ अधिकारी देण्याबाबत दिरंगाई करीत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान येऊ घातलेला पावसाळयात परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता असल्याने येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सक्षम आयुक्त देण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे महापौर पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)