केडीएमसीची आपत्कालीन यंत्रणा कुचकामी!

By Admin | Updated: July 30, 2015 02:02 IST2015-07-30T02:02:37+5:302015-07-30T02:02:37+5:30

‘ए बार्बर विदाऊट रेझर’ अशा अवस्थेचे दर्शन केडीएमसीच्या आपत्कालीन यंत्रणेने मंगळवारच्या ठाकुर्लीतील घटनेत घडविले. लाकूड कापायला करवत नाही की सळई तोडायला कटर नाही.

KDMC emergency system is ineffective! | केडीएमसीची आपत्कालीन यंत्रणा कुचकामी!

केडीएमसीची आपत्कालीन यंत्रणा कुचकामी!

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली
‘ए बार्बर विदाऊट रेझर’ अशा अवस्थेचे दर्शन केडीएमसीच्या आपत्कालीन यंत्रणेने मंगळवारच्या ठाकुर्लीतील घटनेत घडविले. लाकूड कापायला करवत नाही की सळई तोडायला कटर नाही. स्लॅब तोडायला हातोडा नाही की ढिगारा उपसायला फावडे नाही. ज्यांना काम करायचे त्यांना हातात घालायला हॅण्डग्लोज नाहीत की पायात गमबूट नाहीत, अशी अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची दिसून आली. पण एनडीआरएफ आणि एमएफबी यांनी घटनास्थळाचा ताबा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पहाटे पावणेतीन-तीनच्या सुमारास ‘एमएफबी’च्या जवानांनी घटनास्थळाचा पाच मिनिटांत ताबाही घेतला. अवघ्या १० मिनिटांत अद्ययावत सामान आणून तयारीही सुरू केली. माणसे कुठे अडकली आहेत, हे जाणून घेतले.अर्ध्या तासातच चार जणांना बाहेर काढले. त्यातील तीन जण जिवंत होते. आजूबाजूच्या रहिवाशांसह लोकप्रतिनिधी, जमलेले नागरिक यांनी त्या कठीण प्रसंगातही एनडीआरएफसह एमएफबीच्या जवानांसाठी टाळ्या वाजवून सॅल्यूट केला. ते जवान मात्र गांभीर्य बाळगत तातडीने कामाला लागले.

... अखेर ती वाचली
एका पित्याच्या दोन्ही मुली ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. दैव बलवत्तर म्हणून की काय, सचिन बाबर यांना एका मुलीचा हात मलब्याखाली दिसला. त्यांनी तातडीने हात एकीचा हात पकडला. प्रचंड गोंधळात काहीही ऐकू येत नव्हते. तरीही, त्यांनी हिमतीने तिला बाहेर काढले. तिचा जीव वाचला. पाठोपाठ दुसऱ्या मुलीलाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. आनंदाने
पित्याने जवानाला मिठी मारली.
केडीएमसीच्या आपत्कालीन यंत्रणेच्या दुर्दशेबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्र्यांना विचारणा केल्यावर त्यांनीही वस्तुस्थिती मान्य केली. यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी वेळोवेळी सभागृहात आवाज उठविण्यात येतो. पुढे त्याचे काय होते, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला. इतके वर्ष आपत्कालीन यंत्रणा जैसे थे असल्याची टीका मदतकर्ते राहुल फुलदेवरे यांनी केली.

मृतांची नावे
टी. व्ही. ईश्वरन (६७), उषा कुषण (४९), पार्थिक झांजारिका (१०), उषा सुंदरम (४८), विनू नाडार (११), फ्रान्सिस नाडार (४४), सुलोचना रेडीज (७५), जमनाप्रसाद शर्मा (७०), रोहित गिरी (१८)

जखमींची नावे : प्रदीप शर्मा (२५), भाग्यलक्ष्मी अय्यर (२५), रेखा मालेतकर (१५), सौकिया मालन (१३), असारी सुकुमारन (५०), महेंद्र शर्मा (२८), पनोमल ईश्वरन (६३), हेतल झांजारिका (१९), सुशीला झांजारिका (वय ५०), दीपक रेडीज (५२), ईश्वर झांजारिका (४५) असे ११ जण जखमी झाले. यातील भाग्यलक्ष्मी हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रदीपला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींना केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मालकाला अटक : नऊ जणांचे बळी घेणाऱ्या ठाकुर्ली चोळेगावातील मातृकृपा या इमारतीचा मालक शरद पाटील यांना पोलिसांनी रात्री अटक केली. इमारतीच्या मूळ मालकांचे निधन झाले असून तिची मालकी या मुलाकडे आहे. मालकाच्या पत्नी व इतर मुले यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोकादायक इमारत खाली करण्यासंदर्भात वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, परंतु ठोस कार्यवाही झाली नाही. परिणामी इमारत दुर्घटनाग्रस्त होऊन रहिवाशांच्या जीवितास धोका पोहोचल्याचा ठपका या तिघांवर ठेवला जाणार आहे.

भिंत पडली होती, तर जिन्याजवळ मातीही पडत होती
मातृकृपा इमारत पडण्याआधी दोन दिवसांपूर्वीच या इमारतीची एक भिंत पडली होती. मंगळवारी दिवसभर इमारतीची मातीही पडत होती. तेव्हाच आजूबाजूच्या रहिवाशांनी येथील नागरिकांना घरे खाली करा, असे सांगितले होते, परंतु कोणीही ऐकले नाही. त्यामुळेही समस्येत आणखी भर पडल्याचे सांगण्यात आले.
सतर्कता बाळगत रहिवाशांनी जर आधीच घरे खाली केली असती तर कदाचित ही दुर्घटना एवढी मोठी झाली नसती, अशीही चर्चा सुरू होती. तेथे जे रहिवासी होते, त्यांनीही यास दुजोरा दिला. परंतु, एवढ्या तत्काळ जाणार कुठे? दुसरे घर कोण देणार? घ्यायचे तर पैशांची तजवीज काय? यासह सामान हलविण्यासह कुटुंबाची मानसिकता आदी बाबीही तपासणे आवश्यक होते.
सर्वच जण सूचना देत होते, पर्यायही देत होते, परंतु होत्याचे नव्हते होईल, हे कुणाला ठाऊक होते, असा सवालही त्यांनी सूचनाकर्त्यांना केला. त्यानंतर, मात्र टीकाटिप्पणीला पूर्णविराम मिळाला.

Web Title: KDMC emergency system is ineffective!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.