केडीएमसी नगरसेवकाची नवी मुंबईत ‘दबंगगिरी’
By Admin | Updated: April 1, 2015 00:22 IST2015-04-01T00:22:46+5:302015-04-01T00:22:46+5:30
सिग्नल तोडून पळणाऱ्या नगरसेवकाला वाहतूक पोलिसाने जाब विचारल्याने त्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी खैरणे येथे घडला.

केडीएमसी नगरसेवकाची नवी मुंबईत ‘दबंगगिरी’
नवी मुंबई : सिग्नल तोडून पळणाऱ्या नगरसेवकाला वाहतूक पोलिसाने जाब विचारल्याने त्याला शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी खैरणे येथे घडला. कल्याण - डोंबिवली मनपाच्या काँग्रेस नगरसेवकाचा हा प्रकार असून तुर्भे पोलीस ठाण्यात दोन सहकाऱ्यांसह त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे बेलापूर मार्गावर महापे येथे सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. कडोंमपाचे नगरसेवक जितेंद्र भोईर हे दोन सहकाऱ्यांसह स्कॉर्पिओ कारने सीबीडीच्या दिशेने चालले होते. यावेळी महापे सिग्नल लागलेला असतानाही गाडी न थांबवता ते पुढे निघून गेले. यामुळे तेथे कार्यरत असलेल्या दर्शन कटके या वाहतूक पोलिसाने त्यांचा पाठलाग केला. त्यांनी कार थांबवण्याच्या सूचना देऊनही कार थांबवली जात नव्हती. अखेर खैरणे येथे कार थांबली असता कटके यांनी कार चालवणाऱ्या भोईर यांना सिग्नल तोडल्याचा जाब विचारला. परंतु त्यांच्यात वाद झाला. यावेळी नगरसेवक भोईर यांनी वाहतूक पोलिसावरच दबंगगिरी करत त्याला शिवीगाळ केली. याप्रकरणी वाहतूक पोलीस कटके यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार भोईर यांच्यासह विशाल सोनार (२९) व संजीव बाने (४४) या तिघांवर गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सांगितले. या तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाली.
कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील यापूर्वी त्यांनी आपली दबंगगिरी दाखवली आहे. जितेंद्र भोईर हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. १९ मार्च रोजी महासभेच्या दिवशी महापालिकेच्याच सुरक्षा रक्षकाला त्यांनी मारहाण केली. भोईर हे महासभेसाठी आले असता त्यांनी सुरक्षा रक्षकाला कार पार्क करायला सांगितली. यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांची कार दुसरीकडे कार उभी केली. सभा संपल्यानंतर भोईर यांनी सुरक्षा रक्षकालाच मारहाण केली. (प्रतिनिधी)