कासार मामा संस्कृती कालबाह्य होतेय!
By Admin | Updated: September 14, 2014 22:58 IST2014-09-14T22:58:44+5:302014-09-14T22:58:44+5:30
हिंदू संस्कृतीत बांगड्यांना विशेष महत्त्व आहे, परंतु आजच्या बदलत्या युगामध्ये आणि फॅशनेबल जमान्यात बांगड्या भरण्याचे प्रमाण कमी होत आहे.

कासार मामा संस्कृती कालबाह्य होतेय!
अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडला
हिंदू संस्कृतीत बांगड्यांना विशेष महत्त्व आहे, परंतु आजच्या बदलत्या युगामध्ये आणि फॅशनेबल जमान्यात बांगड्या भरण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बांगड्या विक्रीसाठी गावोगावी, वस्तीवस्तीमध्ये फिरणरे कासार मामा दिसेनासे झाले आहेत. सध्याच्या जमान्यात हा व्यवसायच अडचणीत आला आहे.
लहान मुलींपासून ते सुवासिनी महिलाही आदराने सणासुदीच्या दिवसात आलेल्या कासार मामांचे स्वागत करायच्या. लग्न मंडपात त्यांना मोठा मान असायचा. आठवडा, पंधरवड्याने कासार मामा हे शब्द कानी पडायचे. हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेली ‘हिरवी बांगडी’ ही सणसमारंभालाच दिसते. ज्या रंगाचे कपडे असतात, त्याच रंगाच्या फॅशनेबल डिझाईनच्या बांगड्या दिसू लागल्या आहेत. युवतीच्या हातातील बांगडी जाऊन त्या ठिकाणी ब्रेसलेट, कंकण दिसत आहेत. पूर्वी कासार मामा खांद्यावर किंवा डोक्यावर पेरी थैला घेवून संपूर्ण गावभर हिंडत असायचे. त्यावेळी व्यवसायही खूूूप प्रमाणात चालायचा. काही लोकांचा आजही पिढीजात व्यवसाय सुरु आहे. परंतु त्याला उतरती कळा लागली आहे.
बांगड्या बनविणाऱ्या अनेक कंपन्या आल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला ज्या डिझाईन येतील त्या मिळत आहेत. सध्या बाजारपेठेमध्ये प्लास्टिक व कचकडीच्या बांगड्यांची धूम आहे. फॅशनेबल बांगड्यांकडे तरुणींसह महिलांचा अधिक कल दिसून येतो. त्यातच ही आधुनिक फॅशन कासार मामांच्या मुळावर आली आहे. बांगड्या विक्रीसाठी जळगाव येथून आलेले शेख मियॉ यांनी सांगितले की, आम्ही येथे गेली चाळीस वर्षांपासून बांगडी विक्रीसाठी कोकणात येत आहोत. आम्ही बांगडी विक्रीसाठी पूर्वी यायचो तेव्हा एखाद्या घरातील महिलेने बोलावले की आमचे सामान तेथे ठेवत असतानाच महिलांचा घोळका यायचा व एकाच जागी पंधरा वीस डझन बांगड्यांची विक्री होत असे. त्याकाळी दिवसाला जवळजवळ दीडशे ते दोनशे डझन बांगड्यांची विक्री होत असे मात्र, आता जेमतेम चाळीस ते पन्नास डझन होत आहे.