Join us

मुंबईकरांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा? लवकर 'हा' उड्डाणपूल वाहतुकीसाठी होणार खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:28 IST

मशीद बंदरजवळील कर्नाक पूल तीन दिवसांत वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Karnak Bridge: मशीद बंदर रेल्वे स्थानक आणि पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, पथदिवे, रंगरंगोटी, दिशादर्शक फलक उभारणी कामेही झाली आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

हा पूल सेवेत आल्यानंतर मेहरअली युसूफ मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग येथील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कर्नाक पूल जुना झाल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये हा पूल पाडला. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी पालिकेने पुलाच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले.

पुलाची वैशिष्ट्ये

या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून, रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महापालिका हद्दीतील पोहोच रस्त्याची एकूण लांबी २३० मीटर असून, पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे.

मध्य रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार या पुलाचे बांधकाम झाले आहे. सद्यस्थितीत सर्व कामे पूर्ण झाली असून, पूल वाहतुकीसाठी सज्ज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हा पूल सेवेत आणण्याचे नियोजन आहे.

मुंबई शहराच्या दक्षिणेतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित व वाढीव सुविधा उपलब्ध होणार आहे. पूर्व मुक्तमार्गावरून येणारी वाहतूक तसेच पी. डिमेलो मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.  

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका