Join us  

कपिल शर्माला हवी होती शाहरूखसारखी व्हॅनिटी व्हॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 2:46 AM

दिलीप छाब्रियाकडून पाच कोटींची फसवणूक; वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : हास्यकलाकार कपिल शर्मा याला अभिनेता शाहरूख खानसारखी व्हॅनिटी व्हॅन हवी होती. त्यामुळे त्याने शाहरूखसोबत चर्चा केली. तेव्हा त्याच्या व्हॅनिटीची डिझाईन डी. सी. डिझाईनचे संस्थापक दिलीप छाब्रियाने केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर कपिल हा छाब्रियाच्या संपर्कात आला आणि छाब्रियाने त्याची ५ कोटी ३२ लाखांची फसवणूक केली. एकाच चेसिस आणि इंजीन नंबरची वेगवेगळ्या राज्यांत अनेकदा नोंदणी, स्वतःच तयार केलेल्या कारवर कर्ज घेऊन स्वतः खरेदी करणे तसेच एका वाहनावर अनेकदा कर्ज घेणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडने केलेला घोटाळा पोलिसांनी डिसेंबरअखेरीस उघडकीस आणला.

कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल  करीत छाब्रियाला १८ डिसेंबर रोजी अटक केली. हा तपास सुरू असतानाच व्हॅनिटी व्हॅन बनवून देतो, असे सांगून छाब्रिया यांनी ५ कोटी ३२ लाख रुपयांना फसविल्याची तक्रार कपिल शर्मा यांनी केली. वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. कपिलने दिलेल्या तक्रारीत, त्यांची स्वतःची व्हॅनिटी व्हॅन नसल्याने भाड्याने घेतलेल्या व्हॅनसाठी त्याला जास्तीचे पैसे मोजावे लागत होते. दरम्यान, त्याला शाहरूख खानची व्हॅनिटी आवडली व तशीच बनवून घेण्यासाठी त्याने २०१६ मध्ये छाब्रियाची भेट घेतली. छाब्रियाने ६ कोटींचे कोटेशन दिले. कपिलने २०१७ मध्ये गाडीसाठी हप्त्यांमध्ये ५ कोटी ३१ लाख ९३ हजार रुपये दिले.

‘त्या’ ट्रकचा शाेध सुरूn छाब्रियाने कपिलला सांगितले हाेते की, त्याने कपिलच्या व्हॅनिटीसाठी भारत बेंझचा ट्रक वापरला. पथक त्या ट्रकचा शोध घेत आहे. n तसेच व्हॅनिटी नेमकी कुठे आहे? दिलेल्या पैशांचे छाब्रियाने काय केले? याबाबतही अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :कपिल शर्मा गुन्हेगारी