गणेशोत्सवासाठी कणकवली आगार सज्ज

By Admin | Updated: August 19, 2014 23:49 IST2014-08-19T22:42:41+5:302014-08-19T23:49:52+5:30

एस. डी. भोकरे : परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांची सोय

Kankavali depot ready for Ganesh festival | गणेशोत्सवासाठी कणकवली आगार सज्ज

गणेशोत्सवासाठी कणकवली आगार सज्ज

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच पुणे आदी भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या भाविकांना परतीच्या प्रवासासाठी सोयीचे व्हावे यासाठी कणकवली एस. टी. आगाराने नियोजन केले आहे. या एस. टी. आगारातून सुटणाऱ्या नियमित गाड्यांसह जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक एस. डी. भोकरे यांनी दिली.
कोकणात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी अनेक भाविक आपल्या मूळ गावी येत असतात. या भाविकांकडून कोकणात दाखल होण्यासाठी तसेच परतीच्या प्रवासासाठी एस. टी. ला पसंती दिली जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत एस. टी. कडून जादा गाड्यांची सोय करण्यात येते. कणकवली एस. टी. आगारानेही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन केले आहे. मुंबई तसेच पुणे येथून सिंधुदुर्गात ४०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार परतीच्या प्रवासासाठी तितक्याच गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी कणकवली एस. टी. आगारातून ५ व ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता, ३.१५ वाजता तसेच ४.१५ वाजता कणकवली ते बोरिवलीपर्यंत जाणाऱ्या तीन गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर ५, ६ व ७ सप्टेंबर यादिवशी दुपारी ३.४५ वाजता, सायंकाळी ४ वाजता व सायंकाळी ४.३० वाजता कणकवली ते बोरिवलीपर्यंत तीन गाड्या सोडण्यात येतील. तर ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.५० वाजता कणकवली ते बोरिवलीपर्यंत आणखी एक गाडी सोडण्यात येईल.
५ व ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१५ वाजता तर ५, ६ व ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता व सायंकाळी ४.३० वाजता कणकवली ते ठाणेपर्यंत जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येतील. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता तर ५, ६ व ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१५ वाजता कणकवली-परेल अशी गाडी सोडण्यात येईल. ४, ५, ६ व ७ सप्टेंबर या दिवशी नरडवे येथून दुपारी ३.३० वाजता कनेडी, फोंडा, तळेरे ते बोरिवलीपर्यंत जाणारी गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीचे आरक्षण आॅनलाईन करण्यात येणार असून फोंड्यासाठी या गाडीमध्ये १० जागांचा कोटा ठेवण्यात आला आहे. ६ व ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कणकवली-गगनबावडामार्गे निगडी पुणे ही गाडी सोडण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१५ वाजता खारेपाटण-मुंबई तर ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१५ वाजता खारेपाटण-बोरिवली अशी गाडी सोडली जाईल.
प्रवाशांच्या मागणीनुसार फोंडा, तळेरे, खारेपाटण येथूनही मुंबईकडे जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर रेल्वे स्थानकावरूनही विविध गावांमध्ये जाण्यासाठी एस. टी. ची व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त दर दिवशी दुपारी ३.३० वाजता कणकवली-बोरिवली ही गाडी सोडण्यात येणार आहे. तर सावंतवाडी, मालवण, कुडाळ आदी आगारांतून कणकवलीमार्गे मुंबईपर्यंत जाण्यासाठी १७ गाड्यांची सोय करण्यात आल्याचेही एस. डी. भोकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

रेल्वे स्थानकावरूनही एस.टी.ची सोय
गणेशोत्सवाच्या कालावधीत कणकवलीवरून कनेडी तसेच नरडवेच्या दिशेने जाणाऱ्या तसेच येणाऱ्या गाड्या रेल्वे स्थानकामार्गे आणण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
प्रवाशांना आगारांमध्ये अथवा प्रवास करताना समस्या आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Kankavali depot ready for Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.