Join us  

शिक्षणाचं राजकीय हत्यार हिसकावून घेण्याचा सरकारचा डाव, कन्हैय्या कुमार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 9:12 PM

‘जुड़ेगा विद्यार्थी जितेगा INDIA’ या उपक्रमांतर्गत NSUI देशभरातील विद्यार्थ्यांशी कन्हैय्या कुमार संवाद साधत आहेत.

मुंबई : शिक्षण हे राजकीय हत्यार आहे. शिक्षणामुळे माणूस चांगल्या-वाईटाचा विचार करायला शिकतो आणि विचार करणारा तरुण हा सत्ताधाऱ्यांसाठी नेहमीच धोकादायक असतो. त्यामुळे सरकारी शिक्षणव्यवस्था कमकुवत करून शिक्षणाचं हे हत्यार सर्वसामान्यांच्या हातून हिसकावून घेण्याचा डाव सरकारने आखला आहे, अशी टीका NSUI चे प्रभारी कन्हैय्या कुमार यांनी केली. 

‘जुड़ेगा विद्यार्थी जितेगा INDIA’ या उपक्रमांतर्गत NSUI देशभरातील विद्यार्थ्यांशी कन्हैय्या कुमार संवाद साधत आहेत. यावेळी ते म्हणाले, शिक्षणामुळे आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. त्यामुळे आपण तर आपल्या डोक्यावर असलेल्या निष्काम सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. देशात महागाई वाढत आहे, पंतप्रधानांनी दिलेलं दर वर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचं वचन अजिबात पूर्ण झालेलं नाही, गेल्या ४५ वर्षांत नव्हती, तेवढी बेरोजगारी आता देशात आहे. याबाबत कोणीच सरकारला काही विचारत नाही. याउलट मोदी-शाह आपल्या दोन मित्रांची धन करत आहेत, त्याबद्दलही कोणी काही बोलत नाही, असंही कन्हैय्या कुमार म्हणाले.

"सध्याच्या तरुणांवर मोठी जबाबदारी"आजच्या तरुणांवर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांना आताच्या अवघड परिस्थितीतून मार्ग काढत आपलं शिक्षण, करिअर करायचं आहे. त्यानंतर नोकरी शोधण्याची धडपडही आहे. त्याच वेळी त्यांच्यावर देश, लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्याची मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो आपण प्राणपणाने टिकवायला पाहिजे, असा मंत्रही कन्हैय्या कुमार यांनी दिला.

"मुंबई विद्यापीठ, भ्रष्टाचाराचं आगार"या वेळी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात मुंबई विद्यापीठातील गैरव्यवहारांवर ताशेरे ओढले. आज विद्यापीठात एकही काम धड होत नाही. परीक्षा, पेपर तपासणी, निकाल यापैकी एकही गोष्ट धड वेळेत न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे, असं त्या म्हणाल्या. तसंच राज्य सरकारच्या शिक्षणाच्या बाबतीतल्या ढिसाळ धोरणावरही त्यांनी टीका केली. सरकारने आतापर्यंत फक्त खासगी शिक्षणसंस्थांच्या फायद्याचेच निर्णय घेतले आहेत. आम्ही वेळोवेळी या निर्णयांना विरोध करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही, अशी टीका त्यांनी केली. 

"मग मृत्यूच्या दाखल्यावरही पंतप्रधानांचा फोटो हवा"पंतप्रधानांना त्यांनी न केलेल्या गोष्टींचं श्रेय घेण्याची सवय आहे. कोरोना काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाले होते. पण देशात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेलेच होते. त्यावर सरकारचं म्हणणं होतं की, आम्ही कोरोना लसीमुळे इंधन दर कमी करत नाही. मग लोकांना फुकटात लस दिल्याच्या डिमक्या सरकार कोणत्या तोंडाने वाजवत होतं, लसीचे पैसे तुम्ही आमच्याकडून इंधनावरील करातून वसूल करत होतात, अशी टीकाही कन्हैय्या यांनी केली. समजा एखाद्या चांगल्या गोष्टीचं श्रेय तुम्ही घेताय, तर वाईट गोष्टीची जबाबदारी टाळून तुम्हाला चालणार नाही. एका बाजूला कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो लागत होता, तर त्याच वेळी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरही पंतप्रधानांचा फोटो लावायला हवा होता, असा टोला त्यांनी हाणला.

टॅग्स :कन्हैय्या कुमारकाँग्रेसमुंबई