Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवलीच्या 'अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्राला' आंतरराष्ट्रीय मान्यता; न्यूझीलंडचे मंत्री प्रभावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:44 IST

या भेटीदरम्यान मॅक्ले यांनी सायबर सिक्युरिटी, हॉटेल मॅनेजमेंट, डॉमिनोज ट्रेनिंग, व्हाइट गुड्स, अपेरल व शिवणकाम अशा विविध अभ्यासक्रमांचा आढावा घेतला.

कांदिवली (पूर्व) येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळाला आहे. न्यूझीलंडचे व्यापार, गुंतवणूक, कृषी आणि वनीकरण मंत्री टॉड मॅकक्ले यांनी सोमवारी केंद्राची भेट घेऊन त्याच्या आधुनिक प्रशिक्षण सुविधांचे कौतुक केले.

भेटीदरम्यान मॅक्ले यांनी सायबर सिक्युरिटी, हॉटेल मॅनेजमेंट, डॉमिनोज ट्रेनिंग, व्हाइट गुड्स, अपेरल व शिवणकाम अशा विविध अभ्यासक्रमांचा आढावा घेतला. त्यांनी आधुनिक उपकरणे, प्रगत प्रशिक्षण आणि युवकांच्या कौशल्यविकासासाठी केंद्राच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रगती व रोजगाराच्या संधींबद्दल जाणून घेतले. यावेळी कांदिवली पूर्वचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.

केंद्र भारताला जागतिक कौशल्य केंद्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले हे केंद्र महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगर पालिका  आणि एन एसडीसी यांच्या सहकार्याने कार्यरत आहे. ‘ट्रिपल इंजिन’ प्रशासन मॉडेलच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रांशी संपर्क ठेवून युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाते.

मॅक्ले यांनी भारत–न्यूझीलंड द्विपक्षीय संबंधांबद्दलही अभिप्राय दिला. ते म्हणाले की, “शिक्षण व कौशल्य विकास या क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करणे आमच्या प्राधान्यक्रमात आहे. भारतातील युवकांचा बदल आणि त्यांचे कौशल्य केंद्राच्या माध्यमातून घडवलेले भविष्य प्रेरणादायी आहे.”

केंद्राने आतापर्यंत १०,००० हून अधिक युवकांना प्रशिक्षण दिले असून, फक्त एका वर्षात सुमारे ३०,००० रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. महिला सशक्तीकरण, उद्योगमान्य अभ्यासक्रम आणि शहरी समुदायातील परिवर्तन यासाठीही हे केंद्र आदर्श ठरत असल्याची माहिती मंत्री गोयल यांनी दिली.

कौशल्य विकासाच्या क्षेत्रातील या केंद्राच्या कामगिरीमुळे कांदिवलीचे केंद्र महाराष्ट्रात रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी एक आदर्श उदाहरण बनले आहे, आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्याने याचे महत्व अधिकच वाढले असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kandivali's Skill Development Center Gains International Recognition; NZ Minister Impressed

Web Summary : Kandivali's Atal Bihari Vajpayee Skill Development Center received international recognition after a New Zealand minister praised its modern training facilities. The center, a part of PM Modi's vision, has trained over 10,000 youths and facilitated 30,000 job opportunities, empowering women and transforming urban communities through industry-aligned courses.
टॅग्स :मुंबई