कामोठेत सोनसाखळी चोर ताब्यात
By Admin | Updated: August 26, 2014 23:38 IST2014-08-26T23:38:45+5:302014-08-26T23:38:45+5:30
येथील परिसरात पोलिसांनी चोरांचा तब्बल अर्धा तास पाठलाग करुन सोनसाखळी चोराला जेरबंद केले.
कामोठेत सोनसाखळी चोर ताब्यात
कामोठे : येथील परिसरात पोलिसांनी चोरांचा तब्बल अर्धा तास पाठलाग करुन सोनसाखळी चोराला जेरबंद केले. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी वर्तविली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी व घरफोड्यांची संख्या कमी झाली आहे. त्यात आघाडीवर असलेले कामोठे परिसरातील अशा घटना कमी होत चालल्या आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण खाली आले असले तरी काही ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत.
सोमवारी सायंकाळी मूळ नावडे येथील रहिवासी असलेले एक दाम्पत्य मुंबईहून खांदेश्वर रेल्वे स्थानकात उतरले. सहा आसनी रिक्षा पकडण्यासाठी हे नवरा-बायको खांदा कॉलनीकडे चालत चालले होते. जेएनपीटी रोडवरील उड्डाणपुलाखाली हे दोघे आले असता समोरुन एक ३५ वर्षीय तरुण आला आणि त्याने संबंधित महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर त्या दांपत्याने आरडा-ओरड केला. तो ऐकल्यानंतर बीट मार्शल करत असलेले दोन कर्मचारी संबंधित ठिकाणी आले. मात्र त्या चोराने घटनास्थळावरुन पळ काढला. त्याला जेरबंद करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांना दिली. त्यानंतर मुल्लेमवार यांनी आपल्या पथकास घटनास्थळी पाठवले. त्यावेळी चोर पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी खाडीत शिरला. त्याचबरोबर चोरी केलेली सोनसाखळीसुद्धा फेकून दिली. तब्बल ३० मिनिटांनंतर पोलिसांनी संबंधित चोराला पकडले.
दीपक जनार्दन शेडगे (३५) रा. दापोली, जिल्हा रत्नागिरी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी कामोठे परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीमध्ये त्याचा सहभाग आहे का, त्याचबरोबर त्याचे साथीदार कोण आहेत? तसेच चोरी केलेला माल तो कोणाला विकतो? या गोष्टींचा सखोल तपास करणार असल्याचे मुल्लेमवार यांनी सांगितले.