कामोठे बससेवेसाठी प्रवासी एकवटले!
By Admin | Updated: January 25, 2015 22:38 IST2015-01-25T22:38:58+5:302015-01-25T22:38:58+5:30
कामोठेमधील एनएमएमटी बससेवा सुरू झाल्यापासून स्थानिक रिक्षाचालकांनी या बससेवेला विरोध दर्शविला व बससेवा बंद पाडण्याचा इशारा दिला.
कामोठे बससेवेसाठी प्रवासी एकवटले!
पनवेल : कामोठेमधील एनएमएमटी बससेवा सुरू झाल्यापासून स्थानिक रिक्षाचालकांनी या बससेवेला विरोध दर्शविला व बससेवा बंद पाडण्याचा इशारा दिला. याविरोधात कामोठेमधील रहिवासी एकवटले असून बससेवा सुरू ठेवण्यासाठी व प्रवाशांचे म्हणणे मांडण्यासाठी रविवारी कामोठे पोलीस ठाण्याबाहेर चर्चासत्र भरवून त्यात सहभाग घेतला.
एनएमएमटी सुरू झाल्यापासून स्थानिक रिक्षा चालकांनी बससेवेला विरोध दर्शवून कोणत्याही परिस्थितीत बससेवा बंद पाडणारच असा इशारा दिला. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या आंदोलनात रिक्षावाल्यांची बाजू घेतली. या संपूर्ण प्रकरणाबाबत मध्यस्थांची भूमिका घेत रिक्षाचालक व प्रवासी संघ यांची बैठक कामोठे पोलीस ठाण्यात आयोजित करुन ११ सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीमध्ये रिक्षाचालक, आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस व प्रवासी संघाचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आदी सदस्य असणार आहेत. ही समिती प्रवाशांसह रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत विचार करून हा अहवाल मंगळवारी २७ रोजी सादर करेल. दरम्यान, नुकतीच काही दिवसांपूर्वीच एनएमएमटी चालकाला मारहाण करण्यात आली. या घटनांना न घाबरता प्रवासी संघ या बससेवेच्या पाठीशी असल्याचे सिटीझन्स युनिटी फोरम, कामोठे रहिवासी संघाने रविवारच्या चर्चासत्रात सांगितले.
रिक्षाचालकांची मुजोरी पोलिसांनी थांबवावी, तसेच मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्यांची तक्रार थेट आरटीओकडे करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले. सिटीझन्स युनिटी फोरमचे अरूण भिसे, कामोठे रहिवासी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये फोरमचे अरूण भिसे, एस.डी. कोटीयन, संतोष गवस, जयकुमार डिगोळे , रोहित दुधवडकर आदींसह शेकडो रहिवासी उपस्थित होते. (प्रतिनिधी)