Join us  

कमला मिल अग्नितांडव- 'वन अबव्ह' पब बीकेसीत थाटणार नवा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 9:33 AM

'वन अबव्ह' पब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

मुंबई- लोअर परळमधील कमला मिल्समध्ये असलेलं 'वन अबव्ह' पब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.  'वन अबव्ह' पब व त्याच्या शेजारी असणारं मोजो ब्रिस्टो रेस्टॉरन्ट जळून खाक झालं. या अग्नितांडवाला दोन आठवडेही पूर्ण झाले नसताना  'वन अबव्ह'च्या मालकांना नविन ठिकाणी नवा संसार थाटायला सुरूवात केली आहे. नुकताच  'वन अबव्ह'च्या मालकांनी वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स (बीकेसी)मध्ये पबसाठी नव्या जागेचा ताबा घेतला आहे. बीकेसीच्या प्रमुख जागेत या पबला जागा मिळाल्याचं वृत्त फर्स्टपोस्टने दिलं आहे. बीकेसीमध्ये अनेक कंपन्यांचे ऑफिस आहेत त्यामुळेच अनेक हॉटेल व बार बीकेसीमध्ये संसार थाटू पाहत आहेत. 

'वन अबव्ह'चे मालक क्रिपेश संघवी आणि जिगर संघवी यांनी डिसेंबर 2017मध्ये बीकेसीतील जागेच्या करारावर सह्या केल्या असून एप्रिल 2018पर्यंत बीकेसीत 'वन अबव्ह'चा डोलारा पुन्हा सुरू करण्याचं नियोजन असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. बीकेसीतील ट्रेड सेंटर बिल्डिंगच्या तळ मजल्यावर 10 हजार स्क्वेअर फूट जागेत 'वन अबव्ह' नव्याने सुरू करण्याचं काम सुरू होणार आहे. कमला मिल्समध्ये वन अबव्हचं इंटिरिअर ज्या कंपनीने केलं होतं तीचं कंपनी बीकेसीमध्येही इंटिरिअरचं काम पाहणार आहे. वन अबव्हच्या मालकांनी मुंबई महापालिकेकडे नव्या पब उभारणी संदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचीही माहिती मिळते आहे. दरम्यान, एच/इस्ट वॉर्ड अधिकाऱ्याच्या माहितीनुसार,कमला मिल्समधील दुर्घटना लक्षात घेता एप्रिल 2018पर्यंत वन अबव्हला बीकेसीमध्ये पुन्हा पब सुरू करायला मंजुरी मिळणार नाही. 

मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता सध्या कमला मिल्समध्ये लागलेल्या आगीसंदर्भातील चौकशी करत असून येत्या एक महिन्यात ही चौकशी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवकमलामिल्स