Join us  

अहिंसेचा संदेश देण्यासाठी कमल जैन यांनी साकारला दहा कोटी मंत्रांचा चित्राविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 5:48 PM

दहा कोटी मंत्रांना भारतीय भाषा व लिप्यांमधून लोकांपर्यंत आणण्यासाठी णमोकार मंत्र हे चित्रप्रदर्शन कमल जैन यांनी साकारले आहे.

ठळक मुद्देआज जगात हिंसक प्रवृत्ती बळावत असताना अहिंसेचे महत्त्व सर्वांना पटवून देण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत जैन यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कलेच्या माध्यमाचा वापर करण्याचे ठरवले ब्राह्मी लिपीचा भारतातील इतर लिप्यांचा सहसंबंध दर्शवण्यासाठी त्यांनी ब्राह्मी लिपीचा वापर चित्रांमध्ये करण्यावर भर दिला.

मुंबई, दि.11- ख्यातनाम चित्रकार कमल जैन यांचे णमोकार मंत्रानर आधारीत चित्रांचे प्रदर्शन मुंबईत ताज हॉटेल येथे सुरु आहे. एकाच दालनामध्ये दहा कोटी मंत्रांचा आविष्कार या प्रदर्शनामुळे पाहायला मिळत आहे. 50 वर्षांहून अधिक काळ कलाक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कमल जैन यांनी गेली अनेक वर्षे या प्रदर्शनासाठी विशेष मेहनत घेतली आहे.

भारतीय भाषा आणि लिपी आपण विसरत चाललो आहोत अशी खंत जैन व्यक्त करतात. ते म्हणतात इंग्रजी जरी रोजच्या वापरात लिहिण्यासाठी किंवा संवाद साधताना लागत असली तरी त्याचा अर्थ तुम्ही भारतीय आपल्या लिप्या व भाषा विसरून जाव्यात असा होत नाही. आपली भाषा, मातृभाषा, भारतीय लिपी आपल्याला आईसमान आहे. म्हणूनच जैन यांनी सर्व चित्रांमध्ये ब्राह्मी, देवनागरी, गुजराती लिपीमधून णमोकार मंत्र साकारला आहे.

कमल जैन म्हणतात, आज जगात हिंसक प्रवृत्ती बळावत असताना अहिंसेचे महत्त्व सर्वांना पटवून देण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत जैन यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या कलेच्या माध्यमाचा वापर करण्याचे ठरवले आणि या चित्रांची संकल्पना मूर्त स्वरुपात आणली. ब्राह्मी लिपीचा भारतातील इतर लिप्यांचा सहसंबंध दर्शवण्यासाठी त्यांनी ब्राह्मी लिपीचा वापर चित्रांमध्ये करण्यावर भर दिला.

शब्द आणि अक्षर यामध्ये ब्रह्मांड सामावले आहे असे त्यांचे ठाम मत आहे. ही चित्रे काढण्यासाठी कमल जैन यांनी उर्दू लिपीचाही अभ्यास करुन चित्रे साकारली आहेत. तसेच या प्रदर्शनामध्ये एक त्रिमिती चित्रही ठेवण्यात आले आहे. मराठी, हिंदी, गुजराती अशा सगळ्या भाषांनी एकमेकांचा द्वेष करण्याएेवजी एकत्र येऊन भारतीय भाषा वाचवल्या पाहिजेत. पुढच्या पिढ्यांना आपल्या पुर्वजांनी दिलेला वारसा तसाच सोपवायला हवा अशा शब्दांमध्ये ते भारतीय भाषा व लिप्यांचे महत्त्व सांगतात.

टॅग्स :भारत