कल्याण आरटीओत परमीट पडून
By Admin | Updated: March 10, 2015 00:19 IST2015-03-10T00:19:21+5:302015-03-10T00:19:21+5:30
शहरात अवैध रिक्षा मोठया प्रमाणात आहेत. त्यांना आळा घालायचा तर अधिकारी व कर्मचारी या दोघांचीही संख्या वाढवणे गरजेचे आहे.

कल्याण आरटीओत परमीट पडून
कल्याण : शहरात अवैध रिक्षा मोठया प्रमाणात आहेत. त्यांना आळा घालायचा तर अधिकारी व कर्मचारी या दोघांचीही संख्या वाढवणे गरजेचे आहे. कल्याणच्या आरटीओ कार्यालयात ज्या क्लार्ककडे रिक्षा वाहन परमीट देण्याचे काम सुरू होत त्यालाच लाचलुचपत विभागाने दहा हजार रु घेताना पकडल्याने नवीन परमीट १७०० तयार असूनही ती देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज फक्त चार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर काम सुरू असल्याचे कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी सांगितले.
विशेष म्हणजे कल्याणचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांचे हे पद गेले पाच महिने रिक्त होते एक महिन्यापूर्वीच त्यांची नियुक्ती झाली आहे.
कल्याण आर. टी. ओ. कार्यालयातील कामे करणाऱ्या एजंटांबरोबरच कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत असल्याने अवैध एजंटाच्या कामाला चांगला आळा बसला आहे. आता नागरिकांची साथ मिळणे महत्वाचे आहे. आर.टी.ओ.च्या कामासाठी लागणारे सर्व फॉर्म हे इंग्रजी, मराठी दोन्ही भाषेत उपलब्ध आहेत. आॅनलाईन पद्धतीनेही सर्व माहिती उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून फॉर्म भरता येतात.
आज सुमारे १७०० नवीन परमीट तयार आहेत. पण ते वितरीत करण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नाहीत. अवघ्या ५ कर्मचाऱ्यांवर आरटीओचा कारभार सुरू असून बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, डोंबिवली, शिळफाटा व सर्व ग्रामीण परिसर या कार्यालयाच्या कक्षेत येतो. या कार्यालयाच्या कक्षेत सर्वच प्रकारच्या वाहनांची संख्या वाढत आह. ते पासिंगसाठी आवारात येतात. कारवाई करून ताब्यात घेतलेली वाहनेही कार्यालयाच्या आवारातच ठेवावी लागतात. तेथे सुरक्षारक्षकाची कोणतीही सोय नाही. कार्यालयाचा हा सर्व परिसर फक्त अर्धा एकर जागेचा आहे. जर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही तर त्याचा फटका जनतेला बसेल, असे आरटीओचे म्हणणे आहे.