डिजिटल फ्लॅटफॉर्मवरून काकोडकरांनी विद्यार्थ्यांशी साधला ‘लाइव्ह ई-संवाद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:49 IST2020-02-27T00:49:05+5:302020-02-27T00:49:16+5:30
मुंबई : पार्थ नॉलेज नेटवर्क आणि निशिगंधा वाड एज्युकेशन अॅण्ड कल्चरल ट्रस्ट यांच्या द्वारे पार्थच्या डिजिटल फ्लॅटफॉर्मवरून ‘चला वाचू ...

डिजिटल फ्लॅटफॉर्मवरून काकोडकरांनी विद्यार्थ्यांशी साधला ‘लाइव्ह ई-संवाद’
मुंबई : पार्थ नॉलेज नेटवर्क आणि निशिगंधा वाड एज्युकेशन अॅण्ड कल्चरल ट्रस्ट यांच्या द्वारे पार्थच्या डिजिटल फ्लॅटफॉर्मवरून ‘चला वाचू या’ चळवळीचे उद्घाटन आणि शालेय विद्यार्थ्यांशी ‘लाइव्ह ई-संवाद’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. अनिल काकोडकर यांनी १६ पुस्तकांच्या लेखकांचे अभिनंदन करून उपस्थित विद्यार्थ्यांनी जीवनात
एकतरी पुस्तक लिहावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर विज्ञानातील चालू घडामोडींवर प्रकाशज्योत टाकली व सामान्य नागरिकांच्या मनातील विज्ञानाबद्दलच्या कुतुहलाचे निरसन केले. तसेच उपस्थित व लाइव्ह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हसत-खेळत उत्तरे दिली.
डॉ. अनिल काकोडकर यांना संतांची उपमा देऊन त्यांच्या उपस्थितीत ज्ञानाची दिवाळी साजरी होत आहे, अशी भावना डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केली.
‘चला वाचू या’ चळवळीच्या उद्घाटनादरम्यान विजया वाड यांनी लेखन केलेले डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनावर आधारित ‘असा घडला महान शास्त्रज्ञ’ तसेच इतर बालसाहित्यिक आणि कवी यांनी लेखन केलेल्या १६ पुस्तकांचे प्रकाशन डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. विजया वाड म्हणाल्या, जीवन जगण्यासाठी शिक्षण उपयोगी पडते; पण जीवन कसे जगावे यासाठी वाचन उपयोगी पडते. पुस्तक वाचन किती महत्त्वाचे आहे याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.