संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही ‘काजवा महोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:57 AM2019-06-22T00:57:58+5:302019-06-22T00:58:15+5:30

केल्टीपाड्यात संख्या अधिक; पर्यटकांना आधी देण्यात आली माहिती

'Kajwa Mahotsav' in Sanjay Gandhi National Park | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही ‘काजवा महोत्सव’

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही ‘काजवा महोत्सव’

googlenewsNext

मुंबई : काजवा महोत्सवाच्या नावाखाली सह्याद्रीच्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात काजव्यांना पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी होते. परंतु हा काळ काजव्यांच्या प्रजननाचा असतो. परिणामी मानवाच्या गर्दीमुळे काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेमध्ये अडथळा येतो. मात्र, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदा काजवा महोत्सव जून महिन्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी काजव्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी उद्यान प्रशासनाने घेतली होती, असा दावा निसर्ग माहिती केंद्राने केला आहे.

उद्यान प्रशासनाने याआधी कधीही काजवा महोत्सव आयोजित केला नव्हता. मात्र, यंदा काजवा महोत्सवाचा प्रयोग करून पाहण्यात आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कुठे-कुठे काजवे आहेत, किती प्रमाणात दिसतात आणि आपण लोकांना का काजवे दाखवायचे, याची माहिती सर्वप्रथम देण्यात आली. नागरिकांकडून काजवा महोत्सवाला ट्रोल केले जाते. त्याचप्रमाणे नॅशनल पार्कलाही ट्रोल करण्यात आले. परंतु नागरिकांना त्याच्याबद्दल अर्धवट माहिती आहे. भंडारदऱ्यामध्ये काजवा महोत्सवात एका बॅचमध्ये बरीच माणसे सहभागी करून नेली जातात. माणसांच्या गर्दीमुळे काजव्यांना त्रास होतो. मात्र, उद्यान प्रशासनाने २५ जणांची एक बॅच करून काजवे दाखविण्यासाठी केल्टीपाडा या ठिकाणी नेण्यात आले होते. चार दिवसांच्या या काजवा महोत्सवामध्ये काजव्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.

उद्यान प्रशासनाने आता काजवा महोत्सव बंद केला आहे. कारण आता काजव्यांच्या प्रजननाचा काळ सुरू झाला आहे. नॅशनल पार्क हे मुंबईच्या मधोमध असल्याने काजवा महोत्सवाला नागरिकांनी गर्दी केली होती. काजवा महोत्सव पाहण्यासाठी एका बसगाडीची व्यवस्था करण्यात आली होती. ही गाडी काजव्यांपासून काही अंतरावर थांबवून मग तिथून पुढे माणसांना चालत काजवे पाहण्यासाठी नेण्यात आले. या वेळी काही स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली होती. केल्टीपाडा येथे मोठ्या संख्येने काजवे उपस्थित होते.

पावसात संख्या तुरळक
जसा पाऊस पडू लागला तेव्हा काजव्यांची संख्या तुरळक झाली होती. खासगी वाहने, प्लॅश फोटोग्राफीला मनाई करण्यात आली होती. तसेच काजव्यांपासून दूर उभे राहणे, शांतता राखावी इत्यादी सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती निसर्ग माहिती केंद्राचे शिक्षण व विस्तार अधिकारी जयेश विश्वकर्मा यांनी दिली. निवड होत नसल्याने वर्षानुवर्षे कोटा पूर्ण केला जात नाही.

Web Title: 'Kajwa Mahotsav' in Sanjay Gandhi National Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.