कुडाळात पाच एप्रिलपासून कबड्डी स्पर्धा
By Admin | Updated: March 30, 2015 00:27 IST2015-03-29T21:21:29+5:302015-03-30T00:27:55+5:30
राज्यातील नामांकित संघांसह सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथील संघ सहभागी होणार आहेत,

कुडाळात पाच एप्रिलपासून कबड्डी स्पर्धा
कुडाळ : कुडाळमध्ये आमदार वैभव नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर ५ ते ७ एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील नामांकित संघ सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिरसाट म्हणाले, एसएम स्पोर्टस् माणगाव, भवानी मित्रमंडळ गोंधयाळे व युवक कल्याण संघ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने व राज्य असोसिएशन कबड्डीच्या मान्यतेने कुडाळ एसटी डेपो येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आमदार वैभव नाईक चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम ५१ हजार रुपये, द्वितीय ३५ हजार रुपये तर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी १५ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये, याकरिता पाच हजार क्षमता असलेल्या गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, पुष्कराज कोले, कुडाळ सरपंच व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय दर्जाचे मैदानाचे काम सुरू असून, खेळाडू व प्रेक्षकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती शिरसाट यांनी दिली.
पत्रकार परिषदेवेळी आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, सुशील चिंदरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
या स्पर्धेमध्ये मुंबई येथील ओमकल्याण संघ, उत्क र्ष (भांडुप), अंबिका (कुर्ला), अंकुर स्पोर्टस् (मुंबई), विजय क्लब (मुंबई), गुड मॉर्निंग संघ (मुंबई), भैरवनाथ संघ (पुणे), इस्लामपूर व्यायामशाळा संघ (इस्लामपूर), नम्रता प्रतिष्ठान (चिपळूण), शाहू संघ (सडोली), श्रीसाई संघ (नाशिक), जयहिंंद संघ (इचलकरंजी), छापा संघ (कोल्हापूर) या राज्यातील नामांकित संघांसह सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथील संघ सहभागी होणार आहेत, असे शिरसाट यांनी सांगितले.