कळवावासीयांची होणार भारनियमनातून सुटका
By Admin | Updated: August 28, 2014 04:50 IST2014-08-28T04:50:41+5:302014-08-28T04:50:41+5:30
ठाण्यात असूनही भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणाऱ्या कळव्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे

कळवावासीयांची होणार भारनियमनातून सुटका
ठाणे : ठाण्यात असूनही भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणाऱ्या कळव्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. महावितरणने येथे नवीन रोहित्र बसवण्याचे काम हाती घेतले आहे.
भास्करनगर तथा वाघोबानगर, कळवा येथील रहिवाशांच्या कमी दाबाने विद्युतपुरवठा होत असल्याबाबत तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी महावितरणला प्राप्त होत होत्या. त्यानुसार आता येथील नागरिकांना योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरण यंत्रणेत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे. मागील पाच वर्षांत येथील सुधारणांवर १९.८३ कोटींचा खर्च केला असून येत्या दोन वर्षांसाठी पुन्हा ४२.२८ कोटींचा खर्च केला जाणार आहे. ज्यामध्ये खारेगाव येथे २२-११ केव्ही १० एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्राची निर्मिती, भूमिगत यंत्रणेचे काम, खारेगाव पोलीस चौकीजवळ अद्ययावत स्वीचिंग स्टेशनची निर्मिती आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. ६३० केव्हीए क्षमतेची २ विद्युत रोहित्रे बसवणार असल्याने लवकरच कळवावासीयांची भारनियमनातून सुटका होणार आहे. (प्रतिनिधी)