ज्येष्ठांचा आधारच ‘अधांतरी’
By Admin | Updated: August 12, 2014 01:06 IST2014-08-12T01:06:08+5:302014-08-12T01:06:08+5:30
म्हातारपणी एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनण्यासाठी पालिकेने धोरण जाहीर केले़ मात्र, हे धोरण तयार होऊन वर्ष उलटले तरी अद्यापही ते धोरण ‘अधांतरी’ असल्याचे समोर आले आहे़

ज्येष्ठांचा आधारच ‘अधांतरी’
मुंबई : म्हातारपणी एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आधार बनण्यासाठी पालिकेने धोरण जाहीर केले़ मात्र, हे धोरण तयार होऊन वर्ष उलटले तरी अद्यापही ते धोरण ‘अधांतरी’ असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे या धोरणाची घोषणाबाजी करून प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत़
दारिद्रयरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांवर पालिका रुग्णालयांत विनामूल्य शस्त्रक्रिया, करमणुकीस विरंगुळा केंद्र, आरोग्य सेवेकरिता विशेष हेल्पलाइन अशी स्वप्ने या धोरणातून दाखवण्यात आली होती़ या धोरणाला आॅगस्ट २०१३ मध्ये पालिका महासभेची मंजुरी मिळाली होती़ मात्र, वर्ष उलटले तरी अद्याप या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दिशेने प्रशासनाने कोणतीच पावले उचलली नाहीत़
ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीही अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही़ नागपूर आणि पुणे महापालिकांतूनही या धोरणाची प्रत मागवण्यात आली असताना मुंबई महापालिका प्रशासनाची ही उदासीनता खेदजनक असल्याचे मत शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)