Join us  

विनातिकीट प्रवाशांकडून जूनमध्ये ११.१६ कोटी वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 3:15 AM

पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे तिकीट दलालांविरोधात कारवाई करण्यासाठी २२० तपासण्या करण्यात आल्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जून महिन्यात ११ कोटी १६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या मुंबई, भावनगर, राजकोट, अहमदाबाद, वडोदरा, रतलाम या सहा विभागांत विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. जून महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावरून विनातिकीट प्रवास करणारे आणि आरक्षित न केलेले सामान घेऊन जाणारे अशी एकूण २ लाख ३२ हजार प्रकरणे दाखल केली. यातून ११ कोटी १६ लाखांचा दंड पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला.

पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे तिकीट दलालांविरोधात कारवाई करण्यासाठी २२० तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये १८७ व्यक्तींना २७ आरक्षित तिकिटे हस्तांतरित करण्याच्या प्रकरणात पकडले असून, त्यांच्याकडून ३० हजार ९५० रुपये वसूल करण्यात आले. रेल्वे परिसरातील ६०७ अनधिकृत फेरीवाल्यांना आणि २०९ गर्दुल्ल्यांना रेल्वे परिसराच्या बाहेर पाठविण्यात येऊन त्यांच्याकडून दंड आकारण्यात आला. ज्यांनी दंड भरला नाही, अशा १५३ व्यक्तींना कारागृहात टाकण्यात आले, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

टॅग्स :रेल्वेमुंबई ट्रेन अपडेट