सी-लिंकवरून उडी मारून तरुण पोहत किनाऱ्यावर
By Admin | Updated: February 15, 2015 00:59 IST2015-02-15T00:59:29+5:302015-02-15T00:59:29+5:30
वांद्रे-वरळी सेतूवरून समुद्रात उडी मारणाऱ्या अनोळखी तरुणाचे गूढ अद्याप कायम आहे.

सी-लिंकवरून उडी मारून तरुण पोहत किनाऱ्यावर
सीसीटीव्हीच्या चित्रणातून स्पष्ट : युवकांच्या कृत्याचे गूढ कायम
मुंबई : वांद्रे-वरळी सेतूवरून समुद्रात उडी मारणाऱ्या अनोळखी तरुणाचे गूढ अद्याप कायम आहे. उडी मारल्यानंतर हा तरुण पोहून किनाऱ्यावर उतरला आणि दादरच्या दिशेने चालत गेल्याचे सेतूवरील सीसीटीव्हींतील चित्रणात तीन दिवसांनंतर आढळून आले आहे. त्यामुळे या तरुणाचा उडी मारण्याचा हेतू स्पष्ट झालेला नाही़ त्यामुळे वरळी पोलिसांनी त्याची शोधमोहीम सुरू ठेवली आहे.
१० फेब्रुवारीला संध्याकाळी पाचच्या सुमारास या अनोळखी तरुणाने वांद्र्याहून टॅक्सी पकडली. पोल क्रमांक ७७जवळ टॅक्सी थांबवून तो खाली उतरला. टॅक्सीचालक टोल प्लाझापर्यंत गेला आणि त्याने तेथील सुरक्षारक्षकांना सेतूच्या मध्यावर तरुण उतरल्याची वर्दी दिली.
सुरक्षारक्षकांना हा तरुण सेतूवर आढळला नाही. सीसीटीव्हींचे चित्रण न्याहाळले, तेव्हा या तरुणाने समुद्रात उडी मारल्याचे आढळले. त्यानंतर वरळी पोलिसांनी अग्निशमन दल, स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने समुद्रात तरुणाची शोधमोहीम सुरू केली. मात्र दोन दिवसांनंतरही त्याचा पत्ता लागला नाही. एरव्ही सेतूवरून आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह दोनेक दिवसांनी वरळी, दादर किंवा वांद्रे किनाऱ्यावर लागतात. मात्र चार दिवस
लोटले तरी या तरुणाचा काहीच पत्ता न लागल्याने पोलिसांनी सेतूवरील सीसीटीव्हींचे चित्रण बारकाईने पाहिले.
त्यात उडी मारल्यावर तरुणाने सुमारे शंभर मीटर अंतर पोहून पार केले. ओहोटी असल्याने त्याने एका खडकाचा आसरा घेतला. काही वेळ तेथे थांबून तो पोहत पोहत दादर दिशेकडील किनाऱ्याला गेला. तेथून तो चालत पुढे निघून गेला. त्यामुळे त्याने समुद्रात उडी मारण्याचे गूढ कायम राहिले आहे. (प्रतिनिधी)
समुद्रात उडी मारल्यावर तरुणाने शंभर मीटर अंतर पोहून पार केले. ओहोटी असल्याने त्याने एका खडकाचा आसरा घेतला. परत पोहत दादरच्या दिशेने किनाऱ्याला गेला.