जुहू चौपाटीवर समुद्रात अनेक साहसी खेळ किंवा वॉटर स्पोर्ट्स राइड्स सुरू असून, अल्पावधीतच त्या लोकप्रिय झाल्या आहेत. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असताना या साहसी खेळांसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या बोटी व यंत्रसामग्री याबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि विविध अंगांनी 'लोकमत'च्या बातमीदारांनी आढावा घेतला.
मुंबई: पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेल्या जुहू चौपाटी येथील समुद्रात अनेक साहसी खेळ (वॉटर स्पोर्टस राइड्स) सुरू असून, मुंबईकरांमध्ये या खेळांची क्रेझ असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. पण, या साहसी खेळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या बोटी व सामग्रीची नियमितपणे सुरक्षा तपासणी होते किंवा नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पर्यटकांच्या जीविताला धोका किंवा दुखापत होण्याची भीती असून, एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाचे पर्यटन खाते आणि मेरिटाइम बोर्ड हे जबाबदारीसंदर्भात एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. कोणाचेही नियंत्रण नसल्याने अनिर्बंधपणे सुरू असलेल्या या साहसी खेळांकडे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष आहे.
जुहू बीच येथे अलीकडील काळात वॉटर राइड्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत असून, पर्यटक अॅडव्हेंचर आणि थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने व पाण्यात वेगाने केल्या जाणाऱ्या विविध साहसी खेळांमध्ये पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. मात्र, शासनाकडून परवानगी घेण्यात आली आहे का आणि बोटी व अन्य सामग्रीची नियमितपणे सुरक्षा तपासणी होत आहे का, या बाबी महत्त्वाची असून, शासकीय यंत्रणा याबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणाचेही नियंत्रण नसलेल्या या साहसी खेळांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास किंवा पर्यटकांच्या जीवाशी खेळ झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या साहसी खेळांमध्ये पर्यटकांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याने एखादेवेळी दुखापत होण्याची शक्यता आहे.
मेरिटाइम बोर्ड आणि पोलिसांची जबाबदारी
जुहू येथील समुद्र किनाऱ्यावरील साहसी खेळांना प्राथमिक परवानगी राज्य शासनाच्या पर्यटन विभागातर्फे देण्यात आली असली तरी त्यानंतर नियमनाबाबतची पुढील जबाबदारी प्रामुख्याने मुंबई मेरिटाइम बोर्ड आणि पोलिसांची असते, असे राज्य शासनाच्या पर्यटन खात्याचे संचालक बी. एन. पाटील यांनी 'लोकमत'ला सांगितले. जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असेल किंवा काही अडचणी व नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारी असतील, तर पोलिसांना पत्र पाठवून याबाबत सूचना दिल्या जातील.
बोटी व यंत्रसाम्रगीची नियमित तपासणी आवश्यक साहसी खेळ किंवा बोट राइड्सला परवानगी देताना विविध शासकीय यंत्रणांकडे संबंधित मालक व चालकांची माहिती, सुरक्षेची साधने (लाइफ जॅकेट), यंत्रसामग्रीच्या तांत्रिक बाबी, पर्यटकांचा विमा, जीवरक्षक व्यवस्था आणि अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आदी असणे गरजेचे आहे.
समुद्रातील साहसी खेळांसाठी ज्या संस्था पुढाकार घेतात, त्यांची नोंदणी करण्याचे काम बोर्डाकडून केले जाते. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जाची छाननी होते. त्यानंतर समुद्रात बोर्टीच्या माध्यमातून जे काही साहसी खेळ होणार असतील; त्यासाठी त्या बोटी सुस्थितीत आहेत का, याची कसून पाहणी केली जाते. त्यानंतरच संबंधित संस्थेची नोंदणी केली जाते. एकदा नोंदणी झाल्यावर पुढील जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची असते. काही वर्षांपूर्वीच ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रदीप बढिये, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड
जुहू बीचवर वाढत असलेल्या पर्यटकांच्या गर्दीसाठी त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही योग्य प्रकारे पार पाडत आहोत. दीक्षित गेडाम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ९
Web Summary : Juhu beach water rides lack safety checks, raising accident concerns. Authorities shift responsibility, leaving tourist safety at risk. No clear accountability exists.
Web Summary : जुहू बीच पर जल सवारी में सुरक्षा जांच का अभाव है, जिससे दुर्घटना की चिंता बढ़ रही है। अधिकारी जिम्मेदारी से बच रहे हैं, जिससे पर्यटकों की सुरक्षा खतरे में है। कोई स्पष्ट जवाबदेही नहीं है।