गौरी टेंबकर-कलगुटकर, मनोहर कुंभेजकर
मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावरील साहसी खेळांच्या बोट (वॉटर स्पोर्ट्स राइड्स) मालकांकडे असलेल्या कागदपत्रांची व कर्मचाऱ्यांची सांताक्रुझ पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाकडून (एटीसी) तपासणी सुरू करण्यात आली आहे. या बोटमालकांकडे असलेले परवाने व अन्य कागदपत्रे, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आदी तपशील कक्षाकडून मागविण्यात आले आहेत. त्यामुळे वॉटर स्पोर्टस राइड्स चालकांच्या मनमानीला चाप लागण्याची शक्यता आहे.
जुहू समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्टस राइड्स चालकांची मनमानी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष यासंदर्भात 'लोकमत'ने सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, शासनाचे संबंधित विभाग व पोलिसांनी याची गंभीर दखल घेत बोटचालकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
दहशतवादविरोधी कक्षाकडून बोटीचा परवाना, विमा, सर्व्हे सर्टिफिकेट आदी कागदपत्रे पोलिसांनी पडताळणीसाठी मागविली आहेत. बोटीवरील कामगारांचे तपशील, आधारकार्ड व ओळखीचे अन्य पुरावेही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच ही पडताळणी केली होती, असे काही बोटचालकांनी 'लोकमत'ला सांगितले.
'एजंट'वर कारवाईची स्थानिक रहिवाशांची मागणी
वॉटर स्पोर्ट्स राईडच्या व्यवसायात परप्रांतीय असून त्यांनी तिकीटदराच्या ३० ते ४० टक्के कमिशनवर एजेंट नेमले असल्याने भूमिपुत्रांच्या बोटींचा व्यवसाय होत नाही. हे एजेंट कोण व कुठले आहेत? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याची पडताळणी पोलिसांनी करावी, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. परवाना नसलेल्या एका फोटोग्राफरने चौपाटीवर पर्यटकावर हल्ला केला होता. व्यवसायातील चढाओढीमुळे चौपाटीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
भूमिपुत्रांच्या बोटींच्या व्यवसायावर गदा
वॉटर स्पोर्टस राईड्सच्या बोटींची संख्या वाढत असून भूमिपुत्रांच्या बोटींचा व्यवसाय होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे या बोटमालकांनी सांगितले. बोटींची गर्दी या ठिकाणी वाढत असल्याने समुद्रमार्गे तस्करी किंवा घातपाती कारवाया होण्याची भीती येथील जानकी कुटीर रहिवासी कल्याण संघटनेने पोलिसांकडे व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर एटीसीकडून बोटमालकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
Web Summary : Following Lokmat's report, Juhu's water sports boat owners face scrutiny. The Anti-Terrorism Squad is checking permits, insurance, and worker details amid safety concerns and resident complaints of unfair competition from outside agents. Residents fear potential security threats along the coast due to increased boat traffic.
Web Summary : लोकमत की रिपोर्ट के बाद, जुहू के वाटर स्पोर्ट्स बोट मालिकों की जांच शुरू। आतंकवाद निरोधक दस्ता परमिट, बीमा और कर्मचारी विवरण की जांच कर रहा है। निवासियों ने बाहरी एजेंटों से अनुचित प्रतिस्पर्धा की शिकायत की है और सुरक्षा खतरे की आशंका जताई है।