Join us

‘याचि देही, याचि डोळा’ लुटला सूर्यग्रहणाचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 07:08 IST

नेहरू विज्ञान केंद्राच्या वतीने सूर्यग्रहण पाहण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली होती.

मुंबई : मंगळवारी सायंकाळी ४.४९ वाजता सुरू झालेले खंडग्रास सूर्यग्रहण सूर्यास्तापर्यंत पाहता आल्याने मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी विज्ञान, खगोलप्रेमींनी त्याचा आनंद लुटला. नेहरू विज्ञान केंद्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने सूर्यग्रहण पाहण्यासाठीची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये सुरू असलेल्या खगोलीय खेळाने विज्ञानप्रेमींसाठी जणूकाही पर्वणीच ठरली.

नेहरू विज्ञान केंद्राच्या वतीने सूर्यग्रहण पाहण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली होती. यासाठी साडेचारशेहून अधिक नोंदणी केल्याने होणारी गर्दी लक्षात घेता अखेर केंद्राला नोंदणी बंद करावी लागली, तर ज्यांना केंद्रात येणे शक्य होणार नाही अशांसाठी केंद्राने फेसबुक लाइव्हद्वारे दर्शन घडविले. केंद्रात दाखल झालेल्यांसाठी गच्चीवर खास व्यवस्था करण्यात आली होती. 

ग्रहणाची दिली सविस्तर माहितीमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घाटकोपर येथील सर्वोदय नाका येथे ग्रहण पाहण्यासाठीची संधी उपलब्ध केली होती. सोलार चष्म्यातून ग्रहण पाहताना विज्ञानप्रेमींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विज्ञान केंद्रातील खगोलप्रेमींनी सोलार चष्म्यासह सोलार दुर्बीणद्वारे ग्रहण पाहिले. यावेळी ग्रहणाची माहिती देण्यासाठी प्रशिक्षकही उपस्थित होते. सूर्यग्रहण म्हणजे नेमके काय, ते कसे होते? याची उत्तरे देण्यात आली.

टॅग्स :सूर्यग्रहण